जळगाव – जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे श्री साई बाबा मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आजपासून तीन दिवस ‘ब्रह्मोत्वचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवाची पाहणी सोमवारी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. आ.अमोल जावळे यांनी देखील भेट देत साईबाबांचे दर्शन घेतले.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे प्राचीन श्री सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून त्याचा यंदा २२ वा वर्धापनदिन समारोह साजरा करण्यात येत आहे. समारोहनिमित्त आज मंगळवार दि.२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता विश्वविख्यात सुंदरकांड गायिका प.पू.सुश्री.अल्काश्रीजी या सुंदरकांड सादर करणार असून यात हनुमानाच्या भक्तीचे वर्णन आहे. उद्या बुधवार दि.२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून इंडियन आयडॉल फेम गायक नितीन कुमार हे भजन संध्या सादर करणार आहेत.
‘ब्रह्मोत्सवच्या निमित्ताने आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यात साई मंगल कार्यालय, द्वारकामाई हॉल (साई भक्त निवास) ची पाहणी करीत मंत्री महाजन यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, देवकीनंदन झंवर, सुनील झंवर, सुरज (लाला) झंवर, दिपक ठक्कर, शैलेश काबरा आदी उपस्थित होते.