जळगाव – शेतकर्यांनी आता स्वावलंबी झाले पाहिजे. आपल्या शेतमालावर प्रक्रिया करून आपला माल कसा विकता येईल, त्याची साठवणूक कशी करता येईल याबाबत विक्रीचे नियोजन करावे. अद्ययावत कृषी तंत्रज्ञान कृषी यंत्रांची तसेच अपारंपारिक पिकांची माहिती घेण्यासाठी ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी केले.
जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यानच्या अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील आदर्श शेतकरी, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त श्री. तडवी बोलत होते. माजी महापौर सीमाताई भोळे, माजी महापौर भारतीताई सोनवणे, श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, निर्मल सिडसचे डॉ. जे. सी. राजपूत, प्लांटो कृषी तंत्रचे निखिल चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर, आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे, मनसेचे शहराध्यक्ष जमील देशपांडे, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
हजारो शेतकर्यांच्या भेटी
प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी (शनिवारी) हजारो शेतकर्यांनी अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला भेट दिली व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनाला दोन दिवसात सुमारे 50 हजारांहून अधिक शेतकर्यांनी भेट दिली. प्रदर्शनात एकूण 200 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सोमवार (दि. 2 डिसेंबर) पर्यंत प्रदर्शन सुरु आहे.
शेतकरी घेताहेत याची माहिती
छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना परवडतील अशी कृषी यंत्र व औजारे, खतांच्या बाबतीत नॅनो टेक्नॉलॉजी, फवारणीसाठीचे ड्रोन, सोलरवरील वीज पंपाचा डेमो, झटका मशीन, विविध पिकातील करार शेती, टिशूकल्चर केळी, ठिबकचे नवतंत्रज्ञान तसेच बियाणे मधील नवीन व्हरायटी बाबत माहिती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड, नमो बायोप्लांट्स या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक तर प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सिड्स, ओम गायत्री नर्सरी सहप्रायोजक आहेत.