जळगाव – तंत्रज्ञानात दररोज बदल होत असतो आणि हे नवनवीन तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचे काम अॅग्रोवर्ल्ड मागील 9 वर्षांपासून करीत आहे. शेतमजुरीची समस्या लक्षात घेऊन ॲग्रोवर्ल्डने प्रदर्शनात कृषी यंत्र व औजारांचे वैशिष्ट्यपूर्ण दालन उभारले असून त्याला भेट देऊन सर्व माहिती समजून घ्या व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा, असे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.
प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद लाभला. प्रदर्शनस्थळी शेतकर्यांनी विक्रमी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल (एम. जे. कॉलेज) येथे दि. 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान आयोजित अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 29) जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, निर्मल सीडसचे डॉ. जे. सी. राजपूत, नमो बायो प्लांटचे पार्श्व साभद्रा, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, आत्माचे माजी उपप्रकल्प संचालक अनिल भोकरे, राईस एन शाईनचे अमेय पाटील, अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनात कृषी यंत्रांचे 40 तर एकूण 200 हून अधिक स्टॉल्स असून हे प्रदर्शन 2 डिसेंबर (सोमवार) पर्यंत सुरु राहणार आहे.
पहिल्याच दिवशी शेतकर्यांचा विक्रमी प्रतिसाद
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शेतकर्यांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी हजारो शेतकर्यांनी प्रदर्शनाला भेट देवून नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात निर्मल सीड्सच्यावतीने पहिल्या पाच हजार शेतकर्यांना विविध प्रकारच्या भाजीपाला सॅम्पल बियाणे पाकिटाचे मोफत वितरण करण्यात आले. गोदावरी फाउंडेशनतर्फे प्रदर्शनात आलेल्या पुरुष व महिला शेतकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी मोफत करण्यात येत आहे. प्रदर्शन 2 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असून जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड, नमो बायो प्लांट या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक तर प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सीड्स, ओम गायत्री नर्सरी हे सहप्रायोजक आहेत.
आज पुरस्कार वितरण
प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी अर्थात दि.30 (शनिवार) रोजी दुपारी 12 वाजता कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, गट, उद्योजक यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. आमदार सुरेश भोळे, आमदार अमोल हरिभाऊ जावळे, आमदार अमोल चिमणराव पाटील, श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.