चाळीसगाव – चाळीसगाव, इकडे विधानसभा निकालाची उत्सुकता तरी पण मतदारसंघ सोडून सहकाऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आमदार चव्हाण यांनी गाठली अमरावती..
विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांपूर्वी पार पडले असुन गेली दीड दोन महिने प्रत्येक उमेदवार रात्रंदिवस मेहनत घेत होता. निकाल २३ तारखेला असल्याने मधले दोन दिवस बहुतांश उमेदवारांनी घरी राहणे, वैयक्तिक फोनवर संपर्क तसेच निकालाचा आढावा घेणे, व थोडी विश्रांती घेणे याला प्राधान्य दिलेले दिसून आले.
मात्र चाळीसगावाचे विद्यमान आमदार व भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण मात्र याला अपवाद ठरले असून या दोन दिवस मिळालेल्या उसंती चा उपयोग त्यांनी शेकडो किलोमीटर चा प्रवास करून आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होत आपले वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित केले.
झालं असं की, आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कार्यरत श्री.सागर शिंदे या एका सहकाऱ्याला दि.२१ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. शिंदे यांची सासरवाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे असून तिथेच त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली. पती या नात्याने प्रसूतीच्या शेवटच्या महिन्यात पत्नीची काळजी घेणे आवश्यक होते, मात्र निवडणुकीचा कालावधी व दिनांक 20 रोजी मतदान असल्यामुळे आपल्याला शिंदे यांनी आपली जबाबदारीचे भान राखत आमदार चव्हाण यांच्या निवडणूक प्रक्रियेत पूर्णवेळ सहभाग दिला. त्यांच्या या निर्णयाला समजून घेत शिंदे यांच्या पत्नीने व कुटुंबीयांनी देखील साथ दिली.
आपल्या सहकाऱ्याला कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी कळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले व तू बॅग भरून तयार राहा, तुझ्या कन्येला पाहायला आपल्याला अमरावती जायचे आहे असं सांगितले व रात्रीच अमरावती जिल्ह्यातील ४५० किमी दूर चांदुर रेल्वे गाव गाठले.
आपल्या मुलीला व नातीला पाहायला आमदार स्वतः इतक्या लांब आले हे पाहून सर्व नातेवाईक भारावून गेले. स्थानिक महायुती चे पदाधिकारी यांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठत आमदार चव्हाण यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला.
राजकारणात संवेदनशीलता व माणुसकी हरवत चालली असल्याची चर्चा नेहमी होत असते. माणसांचा वापर करा व गरज संपल्यावर सोडून द्या अश्या प्रकारचा वाईट अनुभव मतदारसंघात काही लोकप्रतिनिधी यांच्याकडून आला असल्याचे देखील अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यावर देखील मिळालेल्या दोन दिवसांचा उपयोग आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होत साजरा करणारे आमदार चव्हाण मात्र आगळेवेगळे ठरतात.