जळगाव – शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात प्रत्येकाच्या मनातील विश्वस्ताची भावना विकसित होण्यास पुरेसा वाव आहे, असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिर-२०२४ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, संस्थेच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल व ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांची उपस्थिती होती.
आपल्या मनोगतात डॉ. अनिल काकोडकर पुढे म्हणाले कि, समाजाची आर्थिक उन्नती होत असताना दिसत असले तरी सामाजिक समस्या संपलेल्या नाहीत. सामाजिक विषमता वाढतच आहे व तेच मानसिक अशांतीचे मूळ आहे. काही गोष्टी आम्ही मिळवल्या असल्यात तरी खूप काही गमावलेले आहे. त्यासाठीच येथे उपस्थित युवकांनी संकल्प करण्याची आवश्यकता आहे. आताचा काळ अनुकूल असून महात्मा गांधीजींना अपेक्षित असलेला अहिंसामुक्त, निर्भय भारत निर्माण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सहभागी शिबिरार्थींनी रघुपति राघव राजाराम भजन सादर केले. डॉ. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविकात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी शिबिराची आवश्यकता प्रतिपादित करतांना देशासाठी वेळ देणाऱ्या तरुणांची गरज असल्याचे सांगितले. आपले जीवन समाजासाठी व देशासाठी असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजातील समस्यांना उत्तर शोधण्याची क्षमता युवकांमध्ये असून त्यासाठी बंडखोरवृत्ती वाढली पाहिजे असे ते म्हणाले. शिबिरातून जाण्यापूर्वी आपल्यातील अवगुण शोधून त्यांना दूर सारा, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी शुभेच्छा देताना समाजाप्रती कटिबद्ध होण्यासाठी सिद्ध व्हा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार नितीन चोपडा यांनी केले. या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिरात भारताच्या १८ राज्यासह नेपाळमधील ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.
१२ दिवसीय या निवासी शिबिरात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची गांधी कथा, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांचे ‘पदाशिवाय नेतृत्व’, ‘आपण आणि आपले संविधान’ विषयावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ‘आयुष्यासाठी शिक्षण’ विषयावर डॉ. गीता धर्मपाल, ‘युवक आणि नेतृत्व’ विषयावर दीपक मिश्रा, ‘नेतृत्वाचे उदाहरण’ विषयावर गिरीश कुलकर्णी, ‘चरखा आणि रेषा’ विषयावर भरत मूर्ती, ‘लवचिक समुदायाच्या दिशेने’ विषयावर कल्याण व शोबिता, ‘संघर्ष परिवर्तन व सामाजिक विश्लेषण’ विषयावर डॉ. अश्विन व डॉ. निर्मला झाला यांचे तर ‘गांधीजींचे तत्वज्ञान राजकारण व सत्याचे अनुसरण’ विषयावर बरुण मित्रा यांचे सत्र होणार आहे. तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल जैन यासह विविध मान्यवरांशी शिबिरार्थी संवाद साधणार आहेत. तसेच फराझ खान, कवी संदीप द्विवेदी, अतिन त्यागी यांचे विशेष सत्र होणार आहे. शिबिरात म्युझियम भेट, पीस वॉक, पीस गेम, विविध विषयांवर चर्चासत्र, भारत कि संतान, गोशाळा, शेती व नर्सरी काम इ. गोष्टी होणार आहेत.