जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महाविकास आघाडीच्या जळगाव शहर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा जोरदार रॅलीद्वारे गाठला. आज दि. १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रचाराची रॅली शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधून काढण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १९ मधील महिलांनी जयश्री महाजन यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी उघडपणे आपले मत जयश्रीताई महाजन यांनाच देण्याची तयारी व्यक्त केली. “महिला सक्षमीकरणासाठी आणि शहराच्या विकासासाठी आम्हाला विश्वास आहे की जयश्रीताईच योग्य निवड ठरतील,” असे महिलांनी सांगितले.
आपल्यावर जनतेचा विश्वास असल्याचा आणि जनतेच्या कृपादृष्टीचा उल्लेख करत जयश्री महाजन यांनी आपल्या प्रचार रॅलीत जळगावकरांना आवाहन केले. “शहराच्या अखेरच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. जळगावकरांचा आशीर्वाद मला मतपेटीतून नक्की मिळेल, याचा मला विश्वास आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाजन यांनी त्यांच्या प्रचारामध्ये मतदारांना थेट संदेश दिला. “यावेळी त्रस्त जळगावकरांनी केवळ विकास डोळ्यासमोर ठेवून ‘मशाल’ चिन्हासमोरील बटण दाबून आपला राग मागील लोकप्रतिनिधींवर व्यक्त करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
जयश्री महाजन यांच्या या प्रचार रॅलीमुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. जळगाव शहराच्या राजकीय पटावर महाविकास आघाडीचा हा प्रचार शहरवासीयांना प्रभावी ठरेल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून, जयश्री महाजन यांच्या या प्रचार रॅलीने जळगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.