मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मधापुरी आणि चारठाणा येथील पावरी वाडा या आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांशी संवाद साधला. यावेळी या आदिवासी पाड्यांवर ॲड. रोहिणी खडसे यांचे सडा रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले.
यावेळी आदिवासी बांधवांकडून आपल्या परिवारातील सदस्याप्रमाणे मिळालेले प्रेम पाहून ॲड.रोहिणी खडसे भारावून गेल्या या प्रेमातून उतराई होणे शक्य नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाला आपला परिवार मानून गेले तीस पस्तीस वर्ष आणि रोहिणी खडसे यांनी गेले पाच वर्षात केलेल्या जनसेवेच्या कार्याची सर्व पदाधिकाऱ्यांना या स्वागतातून प्रचिती आली.
याप्रसंगी मतदारांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या, सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या मधापुरी येथील आदिवासी समाजाला आ. एकनाथराव खडसे यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून या समाजाला ओळख दिली. या समाजातील अरुणाताई पवार या महिलेला पंचायत समिती उपसभापती पदापर्यंत नेतृत्वाची संधी दिली. प्रत्येक आदिवासी गाव पाड्यांपर्यंत डांबरी रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधा पोहचवून आदिवासी बांधवांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला. सर्व आदिवासी बांधवसुद्धा गेले पस्तीस वर्ष आ. एकनाथराव खडसे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत. हा विकासाचा रथ असाच सुरू ठेवण्यासाठी आपल्या या लेकीच्या, बहिणीच्या पाठीशी आपली साथ कायम ठेवून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ निशाणी समोरील बटण दाबून आपले मतदानरूपी आशीर्वाद देण्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना विनंती केली.
भविष्यात आदिवासी पाड्यांवर शासकिय योजना पोहचवून त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि राहिलेले विकास कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही रोहिणी खडसे यांनी आदिवासीं बांधवांना दिली. यावेळी शारदाताई चौधरी, निवृती पाटील, दशरथ कांडेलकर, डॉ. बी.सी. महाजन, रामभाऊ पाटील, पुंडलिक सरक, मुन्ना बोंडे, रंजनाताई कांडेलकर, महेश पाचपांडे, बाळा सोनवणे, विलास पूरकर, अक्काबाई भोसले, डॅनी भोसले यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना ऊबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.