जळगाव (प्रतिनिधी) – महादेवनगर भागातील रहिवासी असलेल्या एका जैन यांच्या कुटुंबियांवर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शहराला लागून असलेल्या महादेव नगर भागातील रहिवाशी संजय जैन यांचा मुलगा महावीर हा दूध घेरी होता. रस्त्यात खड्डा असल्याने त्याने मोटारसायकल हळू केली. त्याच वेळी समीर शेख शफी, शफी शोएब, शेख साबीर, अरबाज शेख (आरोपी क्रमांक एक दोन व चार रा. दूध फेडरेशन, राज मालकी नगर, आरोपी क्रमांक ३ रा. महादेव नगर कानडदा रोड) यांनी महावीर यास ‘मला पाहून गाडी हळू केली’ असे म्हणत शिवीगाळ सुरु करुन मारावयास धावून आला.
महावीर हा त्याच्या तावडीतून सुटून घरी पोहचला. त्यानंतर सर्वांनी जैन यांचे घर गाठले व काहीही न सांगता कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात संजय जैन व मुलगा यांचे डोके फुटल्याने रक्ताने माखलेला पाहून मुलीने पोलिसांना फोन केला. हल्लेखोरांनी किराणा दुकानातील मालाची नासधूस केली. तसेच घरातील महिलानाही मारहाण केली.
सुदैवाने खबर मिळताच तात्काळ तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे हे आपल्या सहकार्यांसह दाखल झाल्याने हल्लेखोर तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी जखमी जैन कुटुंबीयांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदर आरोपींविरुध्द रितसर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे. दरम्यान,या प्रकरणी चार संशयित अटक करण्यात आली आहे.