जळगाव (प्रतिनिधी)। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कडून पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तिसऱ्या दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आल्या. ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे सकाळच्या एकूण चार सत्रांमध्ये हे प्रमाण सरासरी ९० टक्के एवढे होते. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होती.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ ऑक्टोबर पासून सुरू झाल्या. बुधवारी परीक्षेचा तिसरा दिवस होता. आज विविध विद्याशाखांच्या २०३ विषयांची परीक्षा होती. सकाळी १० ते १ वाजेपर्यंत झालेल्या परीक्षांच्या चार सत्रात १७ हजार ३७० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली तर या सत्रात १६५० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. या चार सत्रात २० हजार ११७ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. सकाळच्या सत्रात बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होती.
सकाळी दहा वाजता परीक्षेला प्रारंभ झाला. तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालयीन पातळीवरील आयटी समन्वयक आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागात उभारण्यात आलेल्या वॉर रूम मधील प्राध्यापकांनी तातडीने सोडविल्या. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहिला नाही अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी. पाटील यांनी दिली.
तिन्ही जिल्हयात ऑफलाईन परीक्षा सुरळीत सुरु आहेत. विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडण्याची मुभा दिली असल्यामुळे ऑफलाईन मधील अनेक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेकडे वळाले असल्याची माहिती विशेष कार्य अधिकारी प्रा.ए.यु.बोरसे यांनी दिली. सायंकाळी उशीरापर्यंत ऑनलाईन परीक्षा सुरु होती. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार हे सातत्याने या परीक्षेचा आढावा घेवून योग्य त्या सूचना संबंधितांना करीत होते. सर्व अधिष्ठाता देखील या परीक्षांसाठी सहकार्य करीत आहेत.