जळगाव – ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती बालनिकेतन ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली. हा आनंद म्हणजे भवरलाल जैन यांच्या स्वप्नपूर्तीचा आहे’असे मनोगत सेवादास दलिचंद ओसवाल यांनी व्यक्त केले.
मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आली. त्याच्या कोनशिला अनावरण व उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मदनलाल देसर्डा, रोहित बोहरा, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेंद्र मयूर, रमेशदादा जैन उपस्थित होते. यांच्यासह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, अनुभूती बालनिकेतनच्या प्रमुख गायत्री बजाज, डॉ. विश्वेश अग्रवाल, प्रा. अनिल राव, भरत अमळकर, प्रदीप रायसोनी, डॉ. शेखर रायसोनी, डॉ. वर्षा पाटील, मधुभाभी जैन, डॉ. राहुल महाजन, अनिष शहा, यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अंबिका जैन यांनी प्रास्ताविकातून अनुभूती बालनिकेतन सुरु करण्याबाबतचा उद्देश सांगितला. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या धर्तीवर भावनिकदृष्ट्या समाजाची निर्मिती व्हावी आणि एक दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी याच विचारधारेतून अनुभूती बालनिकेतनची सुरवात केल्याचे सौ. अंबिका जैन यांनी सांगितले.
भवरलालजी जैन यांच्या ‘सार्थक करुया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ या विचारांचे प्रतिक म्हणजे अनुभूती बालनिकेतन असल्याचे रोहित बोहरा यांनी म्हटले.
गायत्री बजाज यांनी मॉन्टेसरी तत्वज्ञान काय आहे हे सांगितले. भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी वेगळे काही करता येईल का हा विचार करत होते त्याचे स्वप्न अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराच्या प्रयत्नातून पुर्ण झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरवात हरिहंतो भगवतो.. या मंत्राने दलिचंद ओसवाल यांनी केली. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतनी शक्ती हमें दे ना दाता.. हम होंगे कामयाब हे गीत म्हटले. राष्ट्रगीताने समारोप झाला.