जळगाव (प्रतिनिधी) – बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे येत्या ९ ऑक्टोबरला शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील १९ दिव्यांग शाळांमधील ३०० दिव्यांग बालकलावंतांनी सहभाग घेतला आहे.
बालरंगभूमी ही केवळ महोत्सवी, स्पर्धात्मक किंवा मनोरंजनात्मक स्वरुपापर्यंत मर्यादित न राहता लोकचळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमीचा मानस असून, याचाच भाग म्हणून विशेष मुलांसाठी म्हणजेच दिव्यांग मुलांसाठी ‘यहाँ के हम सिकंदर’ या कलामहोत्सवाच्या माध्यमातून त्यांना सांस्कृतिक रंगमंच उपलब्ध करून दिला आहे.
त्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्याच्याहेतूने आयोजित केलेल्या या महोत्सवात जिल्हाभरातील विशेष मुलांसाठी असणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित १९ संस्था व शाळांनी यात सहभाग घेतला आहे. वय वर्षे १८ खालील ३०० बालकलावंत या महोत्सवात सहभागी झाले असून, या बालकलावंतांद्वारे नाटिका, नकला, गाणे, नृत्य, रांगोळी, चित्रकला, योगा, वाद्यवादन या कला सादर करण्यात येणार आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे आयोजन असलेल्या या महोत्सवाला शहरातील भवरलाल अॅन्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
स..स… संधीचा, नाही सहानुभूतीचा हे ब्रीद असणाऱ्या या महोत्सवाचे स्वरुप स्पर्धात्मक नसून, महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक संघास उचित मानदेय, सन्मानचिन्ह तसेच सहभागी दिव्यांग बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांना शिकविणाऱ्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांचाही पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ या वेळात हा महोत्सव रंगणार आहे.
तरी जळगावकर नागरिकांनी या महोत्सवाला उत्स्फूर्तपणे उपस्थिती देत, दिव्यांग बालकलावंतांचे कौतुक करुन, त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन, बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा अभिनेत्री ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता आकाश बाविस्कर, हर्षल पवार, कार्यकारिणी सदस्य दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, उल्हास ठाकरे, सोशल मिडीया समितीप्रमुख मोहित पाटील आदींनी केले आहे.