जळगाव (प्रतिनिधी) – समाजात आपण कायम चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कधीच कोणाचे वाईट चिंतू नका, हे सर्व संतांचे एकच विचार होते. आपण राष्ट्रासाठी, धर्मासाठी काम करावे. समाजासाठी काम करताना सामाजिक बांधिलकी कायम जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन जळगाव शहराचे आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे श्री संत नरहरी महाराज यांच्या ८३१ व्या जयंती सोहळ्यानिमित्त श्री संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण पाटील, महाराष्ट्र सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय विसपुते, संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, सचिव अतुल भालेराव, शिरसोलीचे सरपंच हिलाल अप्पा भिल्ल, शिरसोलीच्या विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शेनफडू पाटील, माजी नगरसेवक विजय वानखेडे उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला आणि श्री गणेशाच्या मूर्तीला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रस्तावनेमध्ये अध्यक्ष भगवान सोनार यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट करून, सोनार समाजातील विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सर्व समाज बांधवांनी संघटित राहण्याचे आवाहन केले. यानंतर संजय विसपुते आणि लक्ष्मण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून, संत नरहरी महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समाज बांधवांनी पुढे न्यावा असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, ग्रंथ वाचावे. संत समजून घ्यावे. त्यामुळे भगवंत समजून येतात. महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजामध्ये चांगले काम करीत राहिले पाहिजे. राज्यातील महायुती सरकार आल्यावर अनेक योजना जनहितासाठी आणले आहेत. त्याचाही नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे, असेही आमदार भोळे म्हणाले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्रावण ताडे, उपसरपंच शाम बारी, ग्रा प.सदस्य रामकृष्ण काटोले, ॲड. विजय काटोले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संत नरहरी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अनिल सोनार, समाधान सोनार, कैलास सोनार, दिपक अहिराव,संजय सोनवणे,संजय सोनार, मुकुंदा विसपुते, विलास सोनार,गजानन दुसाने,राजू अहिराव यापदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.