जळगाव – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त ‘फेशर्स डे’ साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील एकमेव स्कूल सुरू केली. अनुभूती स्कूलशी जुळवून घेत आपल्यातील कलागुणांना आत्मविश्वासपूर्वक सादर केले. नवनिर्मिती, उत्कृष्टतेसाठी, स्वागतार्ह काय याची समज होऊन नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. भारतीय संस्कृतीत विविधता आहे. भाषा, पंथ, संस्कृती, सांस्कृतिक वारसा यातून भारतीय मूल्यशिक्षणाचे दर्शन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातुन झाले.
सतरा वर्षापासून सुरु असलेल्या स्कूलच्या स्थापना दिनाच्या औचित्याने ‘फ्रेशर्स डे ’ ची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कांताई नेत्रालयाच्या डॉ. भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘भिती ही यशाची पहिली पायरी बनविली पाहिजे कारण भितीमुळे आपण चांगले करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे हवे आहे ते मिळेलच असे नाही त्यामुळे क्रोध करून काहीही फायदा नाही. स्विकार करणे शिकले पाहिजे. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचा विचार करू नये यातूनच स्पर्धेच्या युगात यशस्वी होऊ शकतो.’
सुरवातीला स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. ‘छमक छमक घुमर घुमर’ … या गीतावर राजस्थानचे पारंपारिक नृत्यातून संस्कृतीचे दर्शन घडविले. उडिसाचे कांचीविजय नाट्य सादर झाले. यात राजा पुरूषोत्तम देव यांच्या संघर्षाची कहाणी विद्यार्थ्यांनी उलगडुन दाखविली. युध्दानंतरच्या परिणामांची परिस्थितीही दाखविली. माणिक यांच्याकडून प्रभू जगन्नाथाने प्यायलेले पाणी, राजकुमारी पद्मावतीचा विवाहाचा प्रसंग हूबेहूब सादर केले. ‘जय जगन्नाथ हमे रहने अपने चरनो मे हे भजन’,
‘सर देशा तू जननी भारत देशा’ हे देशभक्तीपर गीत, अनूभुतीचे विस दिवस यावर अथर्व कांबळे याने व्यक्त केलेले मनोगत, तामिळनाळुचे त्रिवृदा नृत्य, रामायणातील विश्वामित्रा, गुरू वशिष्ट यांची श्रीराम लक्ष्मण यांची भेट हा क्षण, भगवान श्रीकृष्णाच्या गीतावर नृत्य सादर केले. मेरी चौकट मे… राम भजन, मिमिक्री, मेरी माँ.. तेरे जैसा यार कहॉ.. हे गीत गायन, तबला वादन, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत भाषण अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलीत. मणिपूरच्या पारंपरिक नृत्याने ‘फेशर्स डे’चा समारोप झाला. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् झाले.
दरवर्षी स्कूलचा स्थापना दिन व फेशर्स डे साजरा केला जातो. यादिवशी स्कूलमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना अनुभूती स्कूलची शैक्षणिक जीवनमूल्यांची ओळख झालेली असते. अनुभूती स्कूल निवासी असल्याने विद्यार्थी येथील वातावरणाशी एकरूप होतात. हा आनंदोत्सव म्हणजे फेशर्स डे यात विद्यार्थ्यांनी धम्माल केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन क्रीश संघवी, वर्धनी अग्रवाल यांनी केले.