जळगाव – जळगाव जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले गजानन मालपुरे यांच्यावर २०१४ मध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. कारवाईच्या आदेशाला त्यांनी नाशिक विभागीय आयुक्त व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सर्व पडताळणी अंती खंडपीठाने गजानन मालपुरे यांचे हद्दपारीचे आदेश रद्द केले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी गजानन मालपुरे यांच्यावर २०१४ मध्ये १ वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश पारीत केले होते. मालपुरे यांनी आदेशाला आव्हान दिले असता त्यावर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची देखील साक्ष नोंदवण्यात आली होती. तसेच मालपुरे यांचे देखील म्हणणे ऐकून घेण्यात आले होते. हद्दपार करताना राजकीय गुन्हे असतांना देखील ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे मांडण्यात आले होते.
सर्व सुनावणी पार पडल्यावर विभागीय आयुक्तांनी हद्दपारीचा कालावधी १ वर्षावरून ६ महिने केला होता. आपल्यावर अन्याय होत असल्याने गजानन मालपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील याचिका दाखल केली होती. खंडपीठात याप्रकरणी सुनावणी होऊन हद्दपारीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. न्या.शिवकुमार दिगे यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश सुनावले. गजानन मालपुरे यांच्यातर्फे अँड.विजय पाटील यांनी काम पाहिले.