धरणगाव (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. कारण जळगाव ग्रामीण मतदार संघातून स्मिताताई वाघ यांना ६३ हजारहून अधिकचा तर एकट्या धरणगावातून साडेतीन हजाराहून अधिकचे मताधिक्क्य मिळाले आहे. तर धरणगाव लगत नव्याने स्थापन झालेल्या डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतमध्ये देखील स्मिताताईंनी १४७ मतांचा लीड घेतला आहे. दरम्यान, यामुळे महायुतीला बुस्टर डोस मिळाला असून माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे ईंडीकेटर लागले आहेत.
गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध !
जळगाव ग्रामीण मतदार संघ अनेक वर्षापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला आहे. गत विधानसभेच्या वेळी जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना-भाजपमध्ये मतभेद झाले होते. परंतू त्यानंतरही गुलाबराव पाटील यांनी ६५ हजाराहून अधिकचा लीड मिळवत विजय संपादन केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धरणगावातून स्मिताताई वाघ यांना ११, १०१ मते तर करण पवार यांना अवघी ७,३३० मते मिळाली आहेत. एकट्या धरणगावातून ३,७७३ मतांचा लीड मिळाल्यामुळे शिवसेना-भाजपने एकदिलाने काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे महायुतीला मिळाला बुस्टर डोस मिळाला असून माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे ईंडीकेटर लागले आहेत. एवढेच नव्हे तर बहुतांश जिल्हा परिषद गटांमध्ये देखील महायुतीची सरशी राहिली आहे.
देवकरांचे लागले ईंडीकेटर !
धरणगाव लगत नव्याने स्थापन झालेल्या डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतमध्ये देखील स्मिताताईंनी १४७ मतांचा लीड घेतला आहे. छोटी ग्रामपंचायत असूनही लीड घेतल्यामुळे शिवसेना-भाजपची ताकद अधोरेखित झाली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गुलाबराव पाटील यांच्यासाठी सकारात्मक वातावरण असून मतदारांनी गद्दार, खोके सारखे मुद्दे सपशेल नाकारल्याचे जळगाव जिल्ह्यातील निकालावरून तरी दिसून येत आहे. थोडक्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात झालेली विकास कामे आणि शिवसेना-भाजपची एकजूट लक्षात घेता गुलाबराव पाटील यांच्यासाठी विधानसभा सोपी झाली आहे. तर दुसरीकडे मात्र, माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे ईंडीकेटर लागले आहेत. कारण देवकर यांनी जळगाव ग्रामीणमध्ये काहीच लक्ष दिले होते. उलटपक्षी ते रावेर मतदार संघात जास्त लक्ष घालून होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या भरोसे असलेले देवकरांना आता ठाकरे गट मदत करेल का?, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
विधानसभेच्या दृष्टीने महायुतीला मिळाला बुस्टर डोस !
गत विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि शिवसेनेतील मतभेद कमालीचे वाढले होते. परंतू सर्व मतभेद विसरून ज्यापद्धतीने दोघं पक्षांनी ही निवडणूक अंगावर घेतली. त्याचा परिणाम म्हणून स्मिताताई वाघ यांना 43 हजारहून अधिकचा लीड मिळाला आहे. निवडणूक प्रचारात काळात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने आणि नियोजनबद्धपणे प्रचार करत होते. दुसरीकडे मात्र, ठाकरे गटातील आपसातील मतभेद आणि शरद पवार राष्ट्रवादी गटासोबत न जुळलेली सुसूत्रता, यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यानी एकदिलाने काम केल्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक बुस्टर डोस मिळाला असल्याहे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शिरसोलीतून मोठे मताधिक्क्य !
शिरसोली प्र.न. मध्ये ८ बूथ असून प्रत्येक बूथवर स्मिताताई वाघ यांना चांगले मताधिक्क्य मिळालेले आहे. शिरसोली प्र.न. मधील ८ बूथमधून २, ७४१ मतांचा तर शिरसोली प्र.बो. मध्ये ७ बूथ असून मताधिक्क्य २,७४६ एवढे आहे. संपूर्ण गाव मिळून ५४५७ एवढा लीड स्मिताताई वाघ यांना मिळाला आहे. तसेच बिलवाडी, विटनेर, डोमगाव गावातही स्मिताताई या पुढे आहेत.