पाचोरा (प्रतिनिधी) – भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष नाही. शेतकरी तर त्यांचे नाव काढणे देखील पसंत करत नाही. भाजपच्या धोरणांमुळे शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी असे सगळेच त्रस्त आहेत. त्यांच्या मनात यांच्याविषयी राग आहे, आणि यंदाची निवडणूक ही त्यांच्याविषयी असलेला राग व्यक्त करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन पाचोराचे माजी नगराध्यक्ष तथा पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या पाचोरा-भडगाव मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी (दि. २०) पाचोरा येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शालिग्राम मालकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, भडगाव युवक तालुकाध्यक्ष विकास पाटील, तालुकाध्यक्ष राहूल पाटील, जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, भडगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष रेखाताई देवरे, भडगाव तालुका युवक अध्यक्ष कुणाल पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष अभिजित पवार, सामाजिक न्याय सेल पाचोरा तालुकाध्यक्ष विलास सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष विलास भामरे, अल्पसंख्याक सेलचे भडगाव तालुकाध्यक्ष रफियोद्दिन शेख मुनीर, पाचोरा तालुकाध्यक्ष रज्जुभाई बागवान, शहराध्यक्ष सत्तार पिंजारी, अजहर खान, ओबीसी सेलचे सीताराम पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. वाघ पुढे बोलतांना म्हणाले की, जास्तीत जास्त मतदान कसे पडेल यासाठी नियोजन करून करणदादा पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आता त्यांच्याकडे काहीही उरलेले नाही : करणदादा पाटील
शिवसेनेने मोठ्या हिम्मततीने या मतदार संघात उमेदवार दिला आहे. या मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादीची प्रचंड ताकद आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या जोरावरच भाजपला मतदान मिळाले. आता शिवसेना बाहेर पडल्यामुळे त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नसल्याची टीका करणदादा पाटील यांनी केली. जास्तीत जास्त मतदान करून विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केली.