जळगाव – गुरांसाठी चारा पाहून परतणार्या मावस भावांच्या दुचाकीला डंपरची धडक बसून रोहण कैलास पाटील (१३, रा. चिंचोली, ता. जळगाव) हा मुलगा जागीच ठार झाला. तर त्याचा मावस भाऊ अक्षय संदीप इखे (२६, रा. चिंचोली, ता. जळगाव) हा तरुण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी चार वाजता लेंडी नाला पुलाच्या पुढे आसोदा रस्त्यावर झाला.
तालुक्यातील चिंचोली येथील मजुरी करणारे कैलास पाटील यांचा मुलगा रोहण व त्याचा मावस भाऊ अक्षय इखे हे दोघे जण शुक्रवारी दुपारी आसोदा येथे दुचाकीने (एमएच १९, डीएफ ६५०१) गुरांसाठी चारा पाहण्यासाठी गेले होते. तेथून दोघे जण परतत असताना लेंडी नाला पुलाच्या अगोदरच समोरुन येणार्या डंपरची (एमएच १५, एके ३७२३) दुचाकीला धडक बसली. त्यात अक्षय इखे हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला तर रोहण हा मागच्या चाकाखाली आला. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.
डंपरचालक पसार
अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही जणांनी पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी तालुका पोलिस घटनास्थळी पोहचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. अपघात होताच चालक डंपर जागेवर सोडून पसार झाला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे.
कष्टकरी पाटील दाम्पत्याला एक मुलगी असून रोहण हा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवारी तो गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेला आणि घरी एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची वार्ताच पोहचली. अपघात व रोहणच्या मृत्यूची माहिती मिळताच मयत मुलाच्या आई-वडिलांसह नातेवाईक, गावकर्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी केलेल्या प्रचंड आक्रोशामुळे सर्वांचेच मन हेलावले. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडील तर स्तब्ध झाले होते. रोहण हा चिंचोली येथेच शाळेमध्ये शिक्षण घेत होता. तो नेहमी त्याचा मावस भाऊ अक्षयसोबत रहायचा. कोठेही जायचे असल्यास त्याच्यासोबत तो असायचा. मात्र या १३ वर्षीय भावाने अचानक साथ सोडल्याने अक्षयलाही धक्का बसला.