जळगाव – रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. के.सी.ई.सोसायटीचे एम.जे.कॉलेज नाट्यशास्त्र विभाग, आय.एम.आर. जळगाव व कान्ह कला केंद्र यांच्या सहकार्याने जळगाव केंद्रावरील नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा दि. २ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांपैकी नाट्यछटा व नाट्यवाचन स्पर्धा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये तर एकांकिका स्पर्धा के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत.
आज (दि.२) रंगणाऱ्या या स्पर्धांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील नाट्यछटा स्पर्धेत २३ स्पर्धक तर नाट्यवाचन स्पर्धेत १८ संघ आपली कला सादर करणार आहेत. तसेच एकांकिका स्पर्धांमध्ये खान्देश नाट्य प्रतिष्टान, जळगाव, आय.एम.आर.कॉलेज, जळगाव, उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळ, दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा, के.सी.ई. सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव, फ्लाईंग बर्ड फिल्म ॲण्ड थिएटर्स, जळगाव, कान्ह ललित कला केंद्र, जळगाव असे ७ संघ एकांकिका सादर करणार आहेत.
तरी या स्पर्धेला प्रवेश विनामूल्य असून, शहरातील जास्तीत जास्त नाट्यकलावंत, नाट्यरसिकांनी उपस्थिती देवून, कलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, आय.एम.आर.चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना.भारंबे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे, उपाध्यक्ष ॲड.संजय राणे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.