जळगाव – गेल्या 25 वर्षांपासून लोकसभेसाठी उत्सुक असलेले माजी खासदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील हे आगामी निवडणुकीच्या रिंगणात नसतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या पुढील पिढीतील प्रतिनिधी, त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या गेले सहा महिन्यापासून लोकसभेसाठी तयारी करत आहेत. माजी खासदार डॉ. पाटील यांनी पुढील पिढीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
परंतु आजवर काँग्रेस निष्ठेची पालखी वाहणाऱ्या डॉ. पाटील यांच्या कन्येची पाऊले मात्र भाजपाच्या दिशेने वळतांना दिसत आहेत. आजवर मोठ्या खुबीने डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. केतकी पाटील यांच्या प्रचारमोहिमेतून स्वतः ला वेगळे ठेवले आहे. तर डॉ. केतकी यांनी सुद्धा ‘ब्रँड गोदावरी’ वरच तयारी सुरू केली होती. त्या उमेदवारी करतील, मात्र कोणत्या पक्षाकडून? हा प्रश्न अनुत्तरित होता.
अशातच त्यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाले. विशेष म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते माजी उपाध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते हे प्रकाशन झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. खा. सहस्त्रबुद्धे हे भाजपाच्या थिंक टँक मधील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या हस्ते प्रकाशन करून एका प्रकारे डॉ. केतकी यांची पाऊले काँग्रेस नव्हे तर भाजपाकडे वळू पहात आहेत हे स्पष्ट दिसत आहे.
सन 1998 मध्ये डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसच्या तिकिटावर सर्वप्रथम खासदार झाले. त्यावेळी त्यांच्या यशात मोठा वाटा होता तो स्व. मधुकरराव चौधरी आणि स्व. जे. टी. महाजन यांचा. त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांनी सहज विजयश्री संपादन केली होती. त्यानंतरच्या 25 वर्षात आजपर्यंत एक अपवाद वगळता त्यांनी लोकसभेची प्रत्येक निवडणूक लढविली. मात्र त्यात त्यांना नेहमीच अपयश आले. अर्थात या अपयशाची कारणे वेगळी आहेत. त्याचा आढावा नंतर कधीतरी घेऊ. आता नवीन पिढीला लाँच करतांना मात्र डॉ. उल्हास पाटील हे कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाहीत. महविकास आघाडीतील जागा वाटपात रावेर कुणाकडे जाणार? हा कळीचा मुद्दा आहे. शिवाय मोदींच्या करिष्म्यावर भाजपाकडून मात्र सहज विजय मिळू शकतो हे डॉ. पाटील यांच्या लक्षात आले. त्यामुळेच डॉ. केतकी यांची पाऊले भाजपाच्या दिशेने पडू लागली आहेत.
अर्थात तिथेही उमेदवारीसाठी प्रचंड चुरस असल्याने अद्याप पक्ष प्रवेश केला नाही. कारण सर्व ऑप्शन्स खुले असले तर ऐन वेळी निर्णय घेता येईल हा कयास त्यांनी मनाशी बांधला आहे. भाजपा मध्येही विद्यमान खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, स्व. हरिभाऊ यांचे चिरंजीव आणि जिल्हा भाजपाध्यक्ष अमोल जावळे, महामंडलेश्वर प.पू. जनार्दन हरी महाराज यांचेपासून थेट गिरीषभाऊ महाजन यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. अशा वेळी थेट पक्ष प्रवेश न करता चाचपणी करायची आणि मग योग्य वेळी निर्णय घ्यायचा ही खूणगाठ मनाशी बांधूनच डॉ. केतकी यांची तयारी सुरू आहे. अर्थात ऐनवेळी प्रवेश केला तर पक्षातील इतरांना बाजूला ठेऊन उमेदवारी मिळेल काय? ही देखील एक समस्या आहे. मात्र आता इतरांना काँग्रेस निष्ठेचे धडे देणाऱ्या डॉ. उल्हासदादांच्याच घरातून भाजपाकडे अपेक्षेने पाहिले जातेय हे मात्र नक्की.