चाळीसगाव – तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. चाळीसगाव मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या गावांना 25 लाखापासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचा विकास निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
यात पाच हजाराहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांना 50 लाख तर पाच हजाराच्या आतील लोकसंख्या असणाऱ्या गावांना 25 लाख रुपये विकास निधी दिला जाणार आहे.
तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावात एकोपा असावा व गावाचा ही विकास करून घेण्यासाठी गाव पातळीवर ग्रामस्थांनी पक्ष भेद विसरून, गट तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल. चाळीसगाव तालुक्यात येत्या ५ नोव्हेंबर रोजी १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दिनांक 25 ऑक्टोबर रोजी माघारीचा शेवटचा दिवस असून तत्पूर्वी ज्या ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागा बिनविरोध कराव्यात आणि ज्या ग्रामपंचायतींच्या सर्व जागा बिनविरोध होतील त्या 5000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाला 25 लाख व 5000 लोकसंख्येच्या पुढे असलेल्या गावाला 50 लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
यापूर्वी देखील आमदारांनी शब्द पाळला…
मागील ४ वर्षात चाळीसगाव मतदारसंघात अनेक ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी बिनविरोध ग्रामपंचायतीना भरघोस विकासनिधी दिला होता. एक शब्द पाळणारा व गावागावात विकासासाठी पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन काम करणारा आमदार म्हणून मंगेशदादा यांची ओळख असल्यामुळे यावेळेस देखील त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.