जळगाव – आसाम येथे पार पडलेल्या ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदकांसह प्रथम स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेता शिवम शेट्टी, श्रीनिधी काटकर, अभिजीत खोपटे व नीशिता कोतवाल यांना ४ सुवर्णपदके जिंकली असून महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रवीण सोनकुल यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने भारतीय संघटनेकडून सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे व महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.
गुवाहाटी, आसाम येथे ९ ते ११ सप्टेंबर २०२३ दरम्यान ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धा पार पडली.
वरिष्ठ गटात राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील खेळाडूंनी ४ सुवर्णपदक जिंकणे हे प्रथमच घडले आहे. शिवम शेट्टी, अभिजीत खोपडे , श्रीनिधी काटकर व निशिता कोतवाल यांनी ४ सुवर्णपदके जिंकून इतिहास घडवला. नम्रता तायडे , स्वराज शिंदे व प्रसाद पाटील यांनी ३ कांस्यपदके पटकावली आहेत. पूमसे प्रकारामध्ये वैयक्तिक ६० वर्ष गटात मनीषा गरवालिया, ३० वर्षाखालील गटात मृणाली हरणेकर यांनी रौप्यपदक जिंकले आहे. वंश ठाकूर, शिवम भोसले व तनिष मालवणकर यांनीही रौप्यपदके जिंकली आहेत.
महाराष्ट्र टीम प्रमुख तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या महाराष्ट्र संघाने चांगली कामगिरी केली. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत असलेले प्रवीण सोनकुल यांना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया कडून “बेस्ट क्योरोगी कोच” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र संघाचे कोच म्हणून प्रवीण संकुल यांच्यासोबत जयेश बाविस्कर, संघ व्यवस्थापक प्रमोद कदम, पुमसे कोच रॉबिन सर, मॅनेजर विद्या जाधव तसेच अमोल तोडणकर, अरविंद निशाद आदी सर्व सपोर्टिंग कोच यांनीही महत्त्वाची जबाबदारी निभावली.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे व धुलीचंद मेश्राम, सचिव सुभाष पाटील, तसेच राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, अजित घारगे, सतीश खेमसकर यांनी सर्व पदक विजेते खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.