जळगाव – दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ (सक्षम – ईसीआय) तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
निवडणूक प्रक्रियेपासून दिव्यांग मतदार दूर राहाता कामा नये, यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साह्य करण्यासाठी या अॅपचा उपयोग होत असतो.
या अॅपचे डिझाइन करताना दिव्यांगांच्या सर्व गरजा विचारात घेतल्या गेल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी नवीन मतदार नोंदणी, स्थलांतराची विनंती (एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी मताचे हस्तांतरण), दुरुस्तीची विनंती, मतदार यादीतून नाव हटविण्याची विनंती, निवडणूक (आधार) प्रमाणीकरणासाठी विनंती, स्थिती ट्रॅकिंग, व्हील चेअरची विनंती, मतदार यादीत तुमचे नाव शोधा, तुमचे मतदान केंद्र जाणून घ्या, बूथ लोकेटर, तुमचे उमेदवार जाणून घ्या, तक्रारी नोंदवा हे पर्याय अॅपमध्ये उपलब्ध आहेत. प्लेस्टोअर वर https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp या लिंकवर जाऊन हे अॅप डाऊनलोड करू शकता. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.