जळगाव – आयुष्यातील कोणतेही ध्येय प्राप्त करणे सहज शक्य असून त्यासाठी आपली क्षमता व कल बघून ध्येय निश्चिती करणे, अचूक मार्गदर्शनाच्या बळावर कठोर परिश्रम व अपयश जरी आले तरी यशोशिखर सर केल्याशिवाय प्रयत्नांची पराकाष्टा करीत राहिल्यास कोणतेही ध्येयप्राप्ती शक्य आहे. आदिवासी तडवी भिल समाजातील तरुण-तरुणींमध्ये प्रचंड शारीरिक व मानसिक क्षमता असून अंगी असलेल्या क्षमतांचा योग्य वापर केल्यास वैयक्तिक जीवनासोबतच पारिवारिक उत्थान व समाज उभारणी होईल असे मत चंद्रकांत इंगळे यांनी व्यक्त केले.
ते पाल येथे आदिवासी तडवी भिल समाज कृती समिती च्या वतीने आयोजित युवा नेतृत्व विकास शिबिराच्या समारोपीय सत्रात बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रा.शमिभा पाटील (राज्य सदस्य वंचित बहुजन आघाडी, राज्य समन्वयक तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समिती, सहा.प्राध्यापक टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूट, प्रा.हसन जहांगीर तडवी (राज्य समन्वयक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मुंबई), डॉ.आमीन अकबर तडवी (वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय यावल), मिना राजू तडवी (लोकनियुक्त सरपंच परसाडे तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद), अनिल साहेब (सार्वजनिक बांधकाम विभाग) व मजित हमीद साहेब (वजनमापे अधिकारी मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक २ व 3 सप्टेंबर रोजी पंचक्रोशीतील तरुणांसाठी आदिवासी तडवी भिल समाज कृती समितीच्या वतीने युवा नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते माजी आमदार जालमखा संडेबाज तडवी, सातपुड्याचा वाघ रमजान सरदार तडवी, जननायक रॉबिन हूड तंट्या मामा भिल, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा, थोर स्वातंत्र्य सेविका मीराबाई तडवी या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक युवा कृती समितीचे अध्यक्ष इंजि.अजित हुसेन तडवी यांनी केले त्यात शिबिराच्या आयोजनामागील हेतू व शिबिरा दरम्यान विविध विषयावर मान्यवरांची भाषणे याबद्दल सविस्तर विवेचन केले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील पहिले व्याख्यान युवा नेतृत्व व स्वयं विकास या विषयावर श्री.चंद्रकांत इंगळे समतादूत येवला नाशिक यांनी अत्यंत साध्या, सोप्या व खुमासदार शैलीत युवकांशी संवाद साधला. गोष्टी व शेरोशायरी च्या माध्यमातून उपस्थितांच्या मने जिंकली . यासोबतच युवा नेतृत्व व स्वयं विकास होण्यण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध पायऱ्यांवर सविस्तर विवेचन केले.


