जळगाव – सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२३ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
स्पर्धेची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना www.maharashtra.gov.in. वर उपलब्ध आहे. अर्ज व सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी आपले अर्ज [email protected] या ईमेलवर दिनांक ५ सप्टेंबर पूर्वी पाठवावेत. जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय निवड समिती सहभागी गणेशोत्सव मंडळांचे उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देवून व्हिडिओ व आवश्यक कागदपत्र प्राप्त करून घेईल तसेच प्रत्येक गणेशोत्सव मंडळास पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक सलोखा, समाज प्रबोधन विषयावरील देखावा/सजावट, स्वातंत्र्य चळवळी संदर्भात देखावा, रक्तदान, वैद्यकीय सेवा, विद्यार्थी, महिला व वंचित घटक यांचेसाठी केलेले कार्य, सांस्कृतिक व पारंपरिक खेळांच्या स्पर्धा, गणेशभक्तांसाठी प्राथमिक सुविधा व आयोजनातील शिस्त इत्यादी बाबींवर गुणांकन करून एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्यस्तरीय समितीकडे करण्यात येईल.
स्पर्धेत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्यस्तरावर प्रथम क्रमांक – ५ लाख रुपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – २ लाख ५९ हजार रूपये आणि प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांक १ लाख रुपये आणि प्रमाणपत्र तसेच प्रत्येक जिल्हयातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे परितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री प्रसाद यांनी केले आहे.