जळगाव (प्रतिनिधी) – एखाद्या महिलेला द्राक्ष गर्भ असणे ही दुर्मिळ घटना असते. मात्र एकाच दिवसात द्राक्ष गर्भ असलेल्या तीन महिलांची शस्त्रक्रिया करणे ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी घडली आहे. वैद्यकीय पथकाने त्यांचे कौशल्य पणाला लावून तीनही महिलांना दिलासा दिला आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे कौतुक केले आहे.
यावल तालुक्यातील हिंगोणा येथील २४ वर्षीय महिलेला अंगावरून रक्तस्त्राव होत होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी केली असता द्राक्ष गर्भाचे निदान झाले. सदरील गर्भ हा सहा महिन्याचा होता. हा गर्भ काढण्याची शस्त्रक्रिया खाजगीत करणे रुग्णाला शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात तिला दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करताना अडीच किलो वजनाचा द्राक्षसदृश गर्भ काढण्यात आला. शस्त्रक्रियेपूर्वी व नंतर अशा एकूण रक्ताच्या पाच पिशव्या लावण्यात आल्या.
यासह जळगाव एमआयडीसी परिसरातील २० वर्षीय महिलेला आणि जामनेर तालुक्यातील पहूर येथील १९ वर्षीय महिलेला देखील द्राक्ष गर्भामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. दोन्ही महिला रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी उपचारासाठी दाखल होत्या. स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांनाही द्राक्ष गर्भ असल्याचे निदान झाले. एखाद्या महिलेला द्राक्ष गर्भ असणे ही हजारातील एखादी घटना असते. मात्र एकाच दिवसात तीन महिलांना द्राक्ष गर्भ आढळणे ही दुर्मिळ घटना होती.
सदर महिलांना दिलासा देण्यासाठी तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यानुसार विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मिताली गोलेच्छा यांनी तिन्ही महिलांची किचकट असणारी द्राक्ष गर्भ शस्त्रक्रिया केली. यामध्ये पूर्ण वाढ झालेला गर्भ नसतो तर पाणी भरल्यासारखे छोटे छोटे गोळे निघतात. यातील दोन जणांच्या पोटामध्ये ५०० ते ६०० ग्रॅम वजनाचे गोळे होते. तर एकीच्या पोटामध्ये अडीच किलोचा गोळा निघाला. गर्भपिशवी पूर्ण धुवून निर्जंतुकीकरण करावी लागली. वैद्यकीय पथकाने त्यांचे कौशल्य पणाला लावून तिनही महिलांना दिलासा दिला. डॉ. मिताली गोलेच्छा यांना स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे, वरिष्ठ निवासी डॉ. राहुल कातखडे, कनिष्ठ निवासी डॉ. विनेश पावरा, डॉ. रणजीत पावरा, डॉ. पूजा वाघमारे, डॉ. पूजा बुजाडे, डॉ. अमृता दूधेकर, डॉ. वैष्णवी नीलवर्ण, परिचारिका नीला जोशी, रत्नप्रभा पालीवाल यांचे सहकार्य लाभले.
द्राक्ष गर्भ सारख्या किचकट शस्त्रक्रिया करून महिलांना दिलासा दिल्याबद्दल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.
द्राक्ष गर्भ म्हणजे मोलार प्रेग्नेंसी आहे तरी काय ?
मोलार प्रेग्नन्सी म्हणजेच द्राक्षगर्भ धारणा ही अबनॉर्मल असते. त्यात पुरुषाचा सुदृढ शुक्राणू महिलेच्या रिकाम्या बीजांडाला चिकटतो. या बीजांडात गुणसूत्र नसतात किंवा दोन शुक्राणू रिकाम्या बीजांडाला चिकटतात. अशावेळी तयार होणाऱ्या गर्भात केवळ पुरुषांचे गुणसूत्र असतात. महिलेचे नसतात. या गर्भात भ्रूण निर्मिती न होता लहान लहान द्रव भरलेले द्राक्ष सदृश गोळे तयार होतात.
– डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्री रोग विभाग.
द्राक्ष गर्भाची लक्षणे दिसल्याच तपासणीला या
अंगावरून रक्त स्त्राव होणे, उलट्या जास्त प्रमाणात होणे,गर्भाची हालचाल न जाणवणे ही द्राक्षे गर्भ असल्याची लक्षणे आहेत. गर्भधारणेनंतर लवकर सोनोग्राफी केल्यास ह्याचे निदान करणे शक्य आहे. तसेच कमी दिवसाच्या द्राक्षगर्भ काढणे हे सुलभ असते. द्राक्ष गर्भ काढल्यानंतर या महिला पुन्हा गरोदर राहून अपत्याला जन्म देवू शकतात.
– डॉ. मिताली गोलेच्छा, सहा. प्राध्यापक.