मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणारी अमेरिकेतील आघाडीची कंपनी अॅपलने आयफोन १२ सिरीजचं अनावरण केलं आहे. यामध्ये त्यांनी चार नवे मॉडेल बाजारात आणले आहेत. मंगळवारी एका ऑनलाईन कार्यक्रमात अॅपलने या नव्या मॉडेल्सची घोषणा केली.
आयफोन 12 सिरीजच्या मोबाईल फोनमध्ये 5जी नेटवर्क चालू शकेल, असंही कंपनीने म्हटलं आहे. यावेळी अॅपलचे प्रमुख टिम कुक म्हणाले की, “आम्ही आयफोनमध्ये 5जी नेटवर्क सुरू करत आहोत. आयफोनकरिता ही नव्या युगाची सुरुवात असेल,”
खिशाला परवडेल अशा किंमतीत
अॅपलने आयफोन १२ (६४, १२८ आणि २५६ GB स्टोरेज), तसेच आयफोन १२ प्रो (१२८, २५६ आणि ५१५ GB स्टोरेज), आयफोन १२ प्रो मॅक्स (६४, १२८, २५६ GB स्टोरेज) हे मोबाईल लाँच केले आहेत. आयफोन १२ सिरीजमधील मोबाईल्सची किंमत ७० हजार रुपयांपासून १ लाख ३० हजार रुपयांपर्यंत आहे. स्टोरेजच्या हिशोबाने याच्या किंमतीत वाढ होत जाते. ६४ GB स्टोरेजच्या आयफोन १२ मिनी मोबाईलची किंमत भारतात ६९ हजार ९०० रुपये इतकी आहे. यातील २५६ GB चं मॉडेल ८४ हजार ९०० रुपयांना मिळणार आहे.
त्याच प्रमाणे ५१२ GB स्टोरेजच्या आयफोन प्रो मॅक्सची किंमत १ लाख ५९ हजार ९०० रुपये आहे. आयफोन १२ मिनी ५ जी तंत्रज्ञान वापरण्यात आलेला जगातील सर्वांत लहान फोन आहे. जगभरात आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रोचं बुकींग १६ ऑक्टोबरपासून सुरू होईल तर हा मोबाईल २३ ऑक्टोबरपासून वितरीत केला जाईल. आयफोन १२ मिनीसाठी बुकींग ६ नोव्हेंबरपासून सुरू होईल. १३ नोव्हेंबरनंतर हा मोबाईल मिळायला सुरुवात होईल.
त्याचप्रमाणे, आयफोन १२ प्रो मॅक्स ६ नोव्हेंबरपासून ऑर्डर करता येईल. २० नोव्हेंबरपासून हा मोबाईल आपल्या हाती येईल. भारतात हा मोबाईल कधीपर्यंत मिळेल, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. एकीकडे कोरोना व्हायरस आणि अर्थव्यवस्थेला फटका बसल्याच्या कारणामुळे जगभरातील बाजारपेठा थंड पडल्या आहेत. अशा परिस्थितीत अॅपल आयफोनच्या विक्रीत गेल्या एका वर्षात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.