जळगाव, दि. 1 – राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरीता 15 एप्रिल ते 15 जून, 2023 दरम्यान शासकीय योजनांची जत्रा हा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील 75 हजार पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रवीण आशिया, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरिक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्याची विविध क्षेत्रात आघाडी
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आजपासून बरोबर 63 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता आपल्या राज्याला ‘जय जय महाराष्ट्र माझा-गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा बढे यांचे गीत राज्यगीत म्हणून मिळाले आहे. गेल्या 63 वर्षांत आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत भर घालीत आहेत. शेतकरी हा आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. या शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध योजना राबवीत आहेत. आजपासूनच शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो’ शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा निधी जमा करण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवांनी घ्यावी काळजी
खरीप हंगामाला लवकरच सुरवात होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळेतच शेतीची कामे उरकावीत. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून त्यानुसार पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात बी-बीयाणे, खते व किटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत. यंदा एल- निनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि पुरेसा पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात.
जिल्ह्यातील प्रकल्पात 40 टक्के जलसाठा
जिल्ह्यातील प्रकल्पांत 40 टक्के जलसाठा आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सिंचनाचे प्रमाण वाढावे म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाययोजना करीत आहे. पहिल्या टप्यात यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.