जळगाव – कृषी संस्कृती हे भारताचे वैभव असून शेतकरी स्वत: संशोधकवृत्तीने काम करतो. कुठलेही प्रयोग शाळेतील संशोधन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच निसर्गाकडे डोळसपणे पाहून जे शेतातील आहे तेच मातीत टाकले तर जमीन सूपीक ठेवता येईल. यात जमीनीची शेती न करता सूर्य प्रकाशाची शेती करावी, त्यासाठी व्हिजन असलेली दूरदृष्टी हवी हे व्हिजन शेतकऱ्यांमध्ये भवरलाल जैन यांनी निर्माण केले. त्यांच्या जीवनातील प्रयोगशिलता हाच शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाचा मार्ग आपण सर्वांनी स्विकारावा असे आवाहन पर्यावरण कार्यकर्ता व अभ्यासक दिलीप जोशी यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘बंजर भूमि और बंजर मन से मुक्त पृथ्वी’ या विषयावर डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार होते. त्यांच्यासोबत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अनिल जैन, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. आरंभी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेरी भावना ही प्रार्थना आणि नमोक्कार मंत्र सादर केले.
प्रास्ताविक अनिल जैन यांनी केले. त्यात ते म्हणाले, ‘जगाला दिशा देण्याचे काम भारत करत आहे. भारतातील शेतकऱ्यांमुळेच संवेदनशिल समाजनिर्मिती होत आहे. शेत, शेतकरी यांच्यात सकारात्मक बदल कसा होईल, याचा ध्यास भवरलालजी जैन यांनी घेतला. ज्ञान विज्ञानातून पुढे आलेले संशोधन थेट सहजसोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल यासाठी अव्याहतपणे त्यांनी कार्य केले. आपल्या मातीशी आत्मीयता ठेवावी हाच संस्कारातून ‘पाणी थेंबाने पिक जोमाने’ हे ब्रिद तंत्रज्ञानाच्या रूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. संशोधन पोहचवित असताना शाश्वत पर्यावरण कसे सांभाळे जाईल याचीही काळजी घेतली. हाच संस्कार घेऊन निसर्गाकडून जे घेतले त्याहीपेक्षा अधिक सुंदर कसे करता येईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.