वाकोद – वाकोदचे नाव जगाच्या पाठीवर पोहचवणारे खऱ्या अर्थाने गाव आदर्श करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ याप्रमाणे कृतिशील आचरण करणारे या गावाच्या भूमीत जन्माला आले हे गावचे भाग्य असल्याचे मत भूमिपुत्र तथा ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री डॉ भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी भव्य ग्रंथ पालखी व वृक्षदिंडी सोहळ्यातून भूमिपुत्राचा जन्मसोहळा वाकोदकरांनी अनुभवला.
वाकोद हे श्रद्धेय भवरलाल जैन यांचे जन्मगाव. याठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्षदिंडी, ग्रंथ पालखी भवरलालजी जैन यांची ग्रंथसंपदा ठेऊन विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढण्यात आली. बैल गाडीवर भवरलाल जैन यांची प्रतिमा ठेऊन भजनी मंडळीच्या साह्याने टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढून भूमिपुत्राचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. या अभियानात राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गौराई कृषी तंत्र निकेतन व विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाकोद, जैन फार्म वाकोद यांचे सर्व सभासद कर्मचारी व ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रभात फेरीचे ठिकठिकाणी रांगोळया काढून पूजा करुन स्वागत करण्यात आले. माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, पोलिस पाटील संतोष देठे, शिरीन शेख यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाकोद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजच्या दिनानिमित्त गावातील नूतन व्यापारी संकुलला कर्मवीर पंढरीदादा पवार व्यापारी संकुल असे नाव देण्यात आले तर जुन्या व्यापारी संकुलला पद्मश्री डॉ. भवरलाल जैन व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरिक तुकाराम जाधव व सरपंच सौ. सरला संजय सपकाळे यांच्याहस्ते झाले तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या पुस्तकात वाकोद येथील शिरीन शेख यांचा लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल तिचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महावीर गुळेचा यांनी केले. प्राचार्य डी. आर. चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी किशोर इंगळे, डॉ. चौधरी, प्रकाश लुंकड, बाबुराव आस्कर, प्रमोद जैन, प्रदीप पाटील, मोहन देशमुख, अभय लोढा, बालु पांढरे, शेख मुस्ताक, मधुकर काटे, विजय भोसले, प्रमोद राऊत, अरूण पाटील, संजय धोबी शेख ईला शेख गुलाब, संदीप जैन, रमेश देठे यांच्यासह जैन फार्म चे सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
पंचक्रोशितील सरपंचांचा गौरव
वाकोद येथे मिरवणूकीच्या समारोपाप्रसंगी वाकोदसह पंचक्रोशितील 12 गावच्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरिगेशनच्या वतीने मदन लाठी, वाकोद जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, तोंडापूर मंडळ अधिकारी एस. बी. तिर्थंकर, वाकोद तलाठी ज्ञानेश्वर घुरके, नितीन राठोड, रमेश छाजेड, महेश देशमूख, अनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंडीत पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते संजय सपकाळे, संजू बनसोडे, श्रीराम पाटील, मुरलीधर शेळके, जगदीश पाटील, संजय पाटील, अनिल गायकवाड, दिलीप रदाळ, राजमल भागवत, शंकर जाधव, रामेश्वर पाटील, राजूभाऊ राजपूत यांचा शाल, श्रीफळ व ‘एक न संपणारा प्रवास ग्राम विकास’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.