जळगाव – भारतात अलीकडे विशीच्या युवकांमध्ये हृदय विकार दिसून येतो आहे. युवकांचा हृदय विकाराने मृत्यू हे देशासाठी शोचनीय आहे. ते टाळण्यासाठी हृदय विकारांवर प्राथमिक प्रतिबंध (अर्थात प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ हार्ट अटॅक ) आवश्यक आहे असे मोलाचे मार्गदर्शन निष्णात हृदय रोग तज्ज्ञ डॉ. रमेश कापडिया यांनी केले.
गांधी रिसर्च फौंडेशनच्या गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात कंपनीच्या सहकाऱ्यांसाठी डॉ. कापडीया यांचे मार्गदर्शनपर सुसंवाद काही दिवसांपूर्वी आयोजण्यात आला होता. त्यांचे स्वागत गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सौ. अंबिका जैन यांनी केले. जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन यांनी डॉ. कापडिया यांची ओळख करून दिली.
हृदय विकार हा आजार नव्हे तर तुमच्या चुकीच्या जीवन पद्धतीचा तो परिणाम आहे. जगातील तरुण मंडळी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडतात ही दुर्दैवी बाब आहे. युवक त्या त्या देशाची अनमोल संपत्ती आहे युवाशक्तीचे हृदयविकाराने निधन होणे ही बाब देशासाठी, समाजासाठी खूप हानीकारक आहे असे कळकळीने सांगितले. युवकांना त्यातून वाचवण्यासाठी प्रत्येकानेच वयाच्या 21 वर्षानंतर आरोग्याच्या, हृदयाबाबतच्या काही तपासण्या अवश्य कराव्यात. व्यक्तीच्या कौटुंबिक हिस्टरीचा विचार अवश्य करावा.
एलडीएल कोलेस्ट्रॉल 70 च्या खाली नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करावा ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आपल्या व्याख्यानात त्यांचे स्वतःचे अनुभव तर त्यांनी सांगितले पण त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे हृदय विकारांच्या झटक्याने निधन झाले एक डॉक्टर म्हणून त्यांनी काय केले त्याबाबत देखील मोलाचे सांगितले. वजन, नियंत्रण ठेवणे, योगा, व्यायाम, चालणे इत्यादी करून आरोग्य उत्तम ठेवावे असे मार्गदर्शन डॉ. कापडिया यांनी केले. त्यानंतर उपस्थित कंपनीच्या सहकार्यांनी मोकळे पणाने प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करुन घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन के.बी. पाटील यांनी केले.