जळगाव – पुस्तकांमुळे जीवनाला परिपूर्णत्व येते पुस्तकेच माणसाचे आयुष्य समृद्ध करतात असे प्रतिपादन कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.माहेश्वरी यांनी केले. सुकृती पिनॅकल हाऊसिंग सोसायटी येथे तेथील फ्लॅट धारकांसाठी सुकृती सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
याप्रसंगी मंचावर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आबा महाजन, जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके, उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक संदीप पाटील ,राज्यकर निरीक्षक तुषार भदाने, सुशीलाबेन पारेख,सोसायटीचे अध्यक्ष ॲड. हेमराज चौधरी, चंद्रशेखर अहिरराव उपस्थित होते.
नवरात्रीनिमित्त होणाऱ्या जेवणाच्या भंडारा ऐवजी सोसायटीतील रहिवासी राज्यकर निरीक्षक तुषार भदाणे यांनी 30000 रुपयाची, तर प्रादेशिक वाहन निरीक्षक संदीप पाटील यांनी दहा हजार रुपयाची तसेच तहसीलदार आबा महाजन यांनी सहा हजार रुपयाची अशी एकूण 46 हजार रुपयाची पुस्तके सोसायटी मधील ग्रंथालयासाठी दान देण्याचे ठरवले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पारंपारिक रूढी परंपरांना छेद देऊन नवीन पायंडा या ठिकाणी निर्माण केला. या ग्रंथालयाचे उद्घाटन कुलगुरू डॉ माहेश्वरी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी पुढे बोलताना माहेश्वरी म्हणाले की, सध्याच्या काळात तरुण पिढीला पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे. भारत देश समृद्ध पुस्तकांच्या आधारे उभा असायला हवा तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून पुस्तकेच बाहेर काढू शकतात. सुकृती सोसायटीतील रहिवासी असल्याचा मला नेहमी अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.
याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तहसीलदार आबा महाजन यांनी मनोगतच सांगितले की, मी अतिशय गरिबीतून शिक्षण घेतले आणि तहसीलदार पदापर्यंत पोहोचण्यामागे पुस्तकांचे वाचनच खरे कारण आहे .यामुळेच गावात भाजीपाला विकण्यापासून साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंतचा प्रवास सोपा झाला.
याप्रसंगी ॲड.केतन ढाके ,ॲड. हेमराज चौधरी,चंद्रशेखर अहिरराव,जयदीप पाटील, गोकुळ महाजन यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी कुरमभट्टी यांनी तर आभार अतुल पाटील यांनी मानले. याप्रसंगी सोसायटीतील सर्व सदस्य संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.