मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या सोळाव्या दिवशी रोहिणीताई खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रावेर तालुक्यातील सिंगनुर, दसनुर, आंदलवाडी ,लहान वाघोदा येथे ग्रामस्थां समवेत संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब, अजित दादा यांच्याकडे, “रडत रडत मला राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार जाहीर करा “अशी विनवणी करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटील यांना आता राष्ट्रवादीवर बोलण्याचा अधिकार नाही. गेल्या ३० वर्षापासून मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादीला ७० ते ७५ हजार मतदान मिळत आलेले आहे. बोदवड तालुका हा मिनी बारामती म्हणून ओळखला जातो तो सदैव शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे. त्यावेळच्या राजकीय परिस्थिती नुसार आ. चंद्रकांत पाटील यांना २०१४ मध्ये राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा दिलेला होता. फक्त तरुण उमेदवार आणि नवीन चेहरा म्हणून त्यांच्या पारड्यात राष्ट्रवादीने मतदान केले होते. ते स्वतः म्हणतात की,फक्त पाच सात -हजार मते राष्ट्रवादीकडे होती,तर पवार साहेब आणि अजित दादा यांच्याकडे ते रडत रडत येऊन पाठिंबा का मागत होते?
केवळ पाच -सात हजार मते असताना त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत करा ही काकूळतीची विनंती करण्याची गरज काय होती?असा सवाल करून कडवट शिवसैनिक म्हणवणारे आमदार पाटील यांनी यापुढे शिंदे साहेबांशी तरी एकनिष्ठ राहावे असा सल्ला दिला.त्यांच्या निवडणूक प्रचारात आणि रॅलींमध्ये फक्त राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचाच भरणा होता हे त्यांनी त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप पाहून खात्री करून घ्यावी.जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी पक्षादेशानुसार त्यांच्यासाठी उमेदवारी माघारी घेऊन फार मोठा त्याग केला आहे, मात्र या त्यागाची जाणीव त्यांनी ठेवली नाही.अशी घणाघाती टीका युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी केली.
संवाद यात्रेला सर्वच गावातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. रोहिणीताई ग्रामस्थ -महिला -युवकांशी संवाद साधून समस्या जाणून घेत आहेत. गेल्या निवडणुकीत पराभव होऊनही जनसेवेची आस असलेल्या रोहिणीताई कार्यकुशल नाथाभाऊंचाच कित्ता गिरवता आहेत असे सांगून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मा. पवार साहेबांचे ,नाथाभाऊंचे हात मजबूत करावे, असे आवाहन रवींद्र नाना पाटील यांनी केले.