मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांच्या प्रभावामुळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वलयामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना ९२ हजार मते मिळाली होती, तर रोहिणीताईना ९० हजार मते मिळाली होती, या ९२ हजारापैकी तब्बल ८२ हजार मते राष्ट्रवादी काँग्रेसची असून उर्वरित १० हजार मते शिवसेनेची होती, सद्यस्थितीत या १० हजार पैकी शिंदेसेनेकडे फक्त ५ हजार मते असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील यांनी केला. रोहिणीताईं खडसेंच्या जनसंवाद यात्रेत ते रावेर तालुक्यातील मस्कावद येथे ते बोलत होते.
यावेळी त्यांनी शिंदेसेनेवर तुफान हल्ला चढवला. मुख्यमंत्री शिंदे हे गद्दारांचा महानेता म्हणजे या ४० चोरांचा महाचोर असून या ४० चोरांना पुढील निवडणुकीत सुरक्षित करण्यासाठी ते मुक्ताईनगरला येत आहे. मात्र पुढील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना फारतर २० हजार मते मिळतील असे स्पष्ट करून आमदार रोहिणीताईच भावी आमदार राहतील असा दावाही केला.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपा शिंदे सेनेला कचऱ्यासारखे बाजूला सारतील, त्यानंतर त्यांना कोणीच वाली राहणार नाही असे सांगून भविष्यात त्यांच्यासमोर भाजपा प्रवेशाशिवाय दुसरा कोणताचा मार्ग असणार नाही असे संकेतही त्यांनी दिले. ज्यांच्या भरोसे आ. पाटील निवडून आले, त्या भैय्यासाहेबांना विजयी झाल्यावर 15दिवसात बाजूला केले, कोणत्याही उदघाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवले नाही. श्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप करून जो पवार साहेबांना, उद्धव साहेबांना आणि भैय्यासाहेबांना झाला नाही तो विश्वास ठेवण्यायोग्य नसल्याचे शल्य त्यांनी बोलून दाखवले.याप्रसंगी, मुक्ताई मंदिरातील पेट्या कोणाच्या घरी जातात?असा आरोप पत्रकार परिषदेत करून त्यांनी वारकऱ्यांचा अवमान केला आहे. मुक्ताईनगर पासून पंढरपूर पर्यंत ऍड भैय्यासाहेबांचे नाव आहे. देवमाणूस म्हणून त्यांचा सन्मान केला जातो,आ पाटील यांनी त्यांच्यावर आरोप करून वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.