मुंबई – सध्या जळगाव जिल्ह्यात गाजत असलेले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण बकाले याने मराठा समाजावर केलेले आक्षेपार्ह्य वक्तव्य तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथे उघड केलेली RTO अधिकाऱ्यांची वसुली या दोन्ही प्रकरणांच्या अनुषगाने आज दि.१५ रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व दोन्ही घटनांची माहिती दिली.
दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत तसेच सर्वसामान्य ट्रक व वाहन चालक यांच्याकडून हफ्ते घेणाऱ्या चाळीसगाव येथील RTO वसुली प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोप केलेले राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही तसेच त्यांना अभय देणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे RTO यांना हफ्ता देणाऱ्या १०० ट्रक व वाहन चालकांची यादीच दिली असून त्यांचा जबाब घेतला जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या दोनही प्रकरणात लक्ष घातल्याने दोन्ही विषयांचे गांभीर्य देखील वाढले असून सदर दोन्ही चौकशीतून काय कारवाई होते याची उत्सुकता आहे.
दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी या दोन्ही प्रकरणांच्या अनुषगाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझी लढाई ही कुठल्या व्यक्ती अथवा जाती विरोधात नसून अन्यायी, भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रवृत्तीविरोधात आहे. या प्रवृत्तीमुळे गोर-गरीब, वंचित, पिडीत घटक यांच्यावर अन्याय होतो, त्यांचे शोषण होते. त्यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरु राहील असे सांगितले.