जळगाव – येथील जुना कडगाव रोडवरील शेतात संदेश लीलाधर आढाळे (वय २२, रा. भादली) या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याची घटना १० रोजी उघडकीस आली होती. या गुन्ह्यात गावातील दोन अल्पवयीन तरुणांना अटक करण्यात आली. दरम्यान, बहिणीची छेडखानी काढत असल्याने दोघांनी संदेशचा मारल्याची पोलिसात कबुली दिली.
जुना कडगाव रोडवरील पाटचारी शेजारील शेतात संदेश आढाळे या तरुणाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तरुणाच्या अंगावरील जखमांवरून त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात संदेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाचा उलगडा करण्यासाठी भुसावळ येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे भादलीत ठाण मांडून होते. संदेशचे मित्र कोण, त्याच्याशी कोणाचे वाद आहे काय, त्याला शेवटचा कॉल कोणाचा होता? याची संपूर्ण माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली. त्यानंतर दोघा संशयितांना भादली येथून ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, उपपोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलिस हेडकॉन्स्टेबल हेमंत मिटकरी, रवींद्र इंधाटे आदींनी ही कारवाई केली.
खून केल्याची कबुली
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास चक्रे फिरवताच संदेश आढाळेचा खून गावातील दोन अल्पवयीन तरुणांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघा संशयितांना सोमवारी दुपारी भादलीतून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, संदेश हा त्या तरुणांच्या बहिणीला त्रास देत होता. त्याच कारणावरून त्या दोघांनी संदेशचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.