मुंबई प्रतिनिधी – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी काढलेले विधान चांगलेच भोवले. त्यांच्यावर होत असलेल्या चौफेर टीकेची दखल घेऊन पाटील यांनी आपला माफीनामा राज्य महिला आयोगास सादर केला. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना “घरी जा आणि स्वयंपाक करा’ असे विधान केले होते.
ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रिया सुळेंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते. यासारखे आयुष्यात दु:ख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्राग्याने केलेल्या उच्चारात सुप्रिया सुळे किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.