जळगाव – महापालिकेतर्फे खंडेरावनगरातील गटारी व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होत असल्याने अडथळा ठरणाऱ्या २० पक्के अतिक्रमणावर जेसीबी चालविण्यात आले.
यावेळी रहिवाशांनी प्रचंड विराेध केल्यामुळे त्याठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली हाेती. तर एका महिलांनी थेट जेसीबीसमाेर येऊन अतिक्रमण तोडण्यास मनाई केल्याने काही वेळ गोधळ निर्माण झाला होता.
शहरातील अत्यंत दाटीवाटीच्या परिसरात खंडेराव नगराचा समावेश हाेताे. या भागातील रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे परिसरातील रस्ते व गटारीच्या कामात अडचणी येत आहेत. मनपाच्या अतिक्रमण व नगररचना विभागाच्या पथकाने गुरूवारी सकाळी कारवाईला सुरूवात केली. रस्त्याच्या दाेन्ही बाजूने १५ ते २० फुटाचे अतिक्रमण असल्याने पक्के बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली.