जळगाव – केंद्र शासनाची अधिसूचना दि २२ मार्च, २०२२ रोजी मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर्स अफेअर्स फूड ॲड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, भारत सरकार यांचेकडील पत्र क्र. FNo. 9-२/२०१६-PD-11/(E-३४४३३६) दि २८ मार्च, २०२२ कक्ष अधिकारी संगणक कक्ष, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून सूचना पत्र क्र. संकीर्ण – २०२२/प्र.क्र. ५६/ सं.क. दि. १२ मे, २०२२ नुसार केंद्र आणि राज्य शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे आधार सिडींग तातडीने विहित मुदतीत करुन घेण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत.
या सूचनानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. जे लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अन्नधान्याचा लाभ घेऊ इच्छितात परंतु त्यांच्याकडे आधार क्रमांक नाही अथवा अद्याप आधारसाठी नोंदणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या दि. २२ मार्च, २०२२ च्या अधिसुचनेनुसार आधार क्रमांक सादर करणेसाठी किंवा आधार नोंदणी करण्यासाठी दि. ३० जून, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जे लाभार्थी दिलेल्या मुदतीत आधार क्रमांक जमा करणार नाहीत त्यांचेसाठी शासन निर्देशानुसार नमुद कागदपत्रांची पडताळणी संबंधित शासकीय अधिकारी यांनी केल्यावरच अन्नधान्याचा लाभ अनुज्ञेय होईल. असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.
यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ज्या लभार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांक सादर केले नाहीत. अशा लाभार्थ्याचे आधार सिडींग करण्याकरीता दि. २५ जुन, २०२२ पर्यंत आधार क्रमांक सादर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. या लाभार्थ्यांनी संबंधित रास्त भाव दुकानदार यांचेकडे आधार क्रमांक सादर करावेत. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक सादर केल्यवर त्वरीत संकलित करण्याच्या सूचना सर्व रास्त भाव दुकानदार यांना देण्यात आल्या आहेत.
तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांक सादर केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी दिनांक २५ जुन, २०२२ पर्यंत आपले आधार क्रमांक जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडुन करण्यात आले आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.