जळगाव – माता, पिता, गुरु आणि संत यांचा अनादर सर्वथा अमान्य असून त्यांचा सदैव सन्मान केला पाहिजे. कारण, त्यांचा अवमान, अपमान, अनादर करणार्यांची अधोगती अटळ आहे, असे प्रतिपादन कथाकार हभप दादा महाराज जोशी यांनी मंगळवारी येथे भागवत कथा सप्ताहात केले.
जळगावच्या केशवस्मृती सेवासंस्था समूहातर्फे आयोजित आणि दाल परिवार, कोगटा उद्योग समूहातर्फे प्रायोजित भागवत कथा सप्ताहात मंगळवारी तिसर्या दिवशी ते बोलत होते. महाबळ मार्गावरील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात शनिवार, २३ एप्रिलपर्यंत दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा सप्ताह श्रोत्यांना वेगळी जीवनानुभूती देत आहे. तिसर्या दिवशी भाविक, श्रोते अधिक व मोठ्या संख्येने या ज्ञानगंगेत सहभागी झाले होते.
कथाकार दादा महाराज म्हणाले की, देह नाशवंत आहे. त्यामुळे भौतिक सुखाच्या आहारी न जाता परमार्थ, नामस्मरणाकडे लक्ष द्या. त्यामुळे जीवन सुखी व आनंदी होईल. श्रद्धा खरी असेल तर निश्चितच अनुभूती प्राप्त होईल.
दादा महाराजांनी मंगळवारी पाचव्या व सहाव्या स्कंदातील कथा भागांचा उहापोह केला. त्यात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू यांच्या वधाची कथा, वराह नारायण अवतार, कपिल नारायण, कदंब ऋषी तसेच मैत्रिऋषी व विदूर हे गुरुभक्त, त्यानंतर ध्रुव राजा, अंग राजा, भरत महाराज यांच्यासंबंधातही विवेचन केले. धु्रव राजा संदर्भात दृष्टांत देतांना दादा महाराज यांनी ती कथाच सांगितली. त्यानुसार धु्रवाने आपल्या आईऐवजी सावत्र मातेला सर्वप्रथम नमस्कार केल्याच्या घटनेच्या अनुषंगाने दादा महाराज म्हणाले की, परमेश्वराच्या सान्निध्यात ज्ञान प्राप्ती झाली की मनातील वैराची भावना निघून जाते. त्यामुळे सत्संग आणि संतसंग सदैव करावा, असे ते म्हणाले.
दुर्वास, वशिष्ठ या ऋषींचे क्षत्रियांवर वर्चस्व राहिले. यासंदर्भात विवेचन करुन त्यांनी सांगितले की, प्रेम भावनेमुळे ज्ञान आणि वैराग्य टिकून राहते. यावेळी निर्मलाबाई रामनारायण कोगटा आणि परिवारातील सदस्यांचीही विशेष उपस्थिती होती. प्रियंका प्रवीण कोठावदे आणि रंजना रतिलाल बडगुजर यांनी आरती व पसायदान सादर केले.
केशवस्मृती सेवासंस्था समुहातील मातोश्री आनंदाश्रम, माधवराव गोळवलकर रक्तपेढी आणि स्व. मांगीलाल बाफना नेत्रपेढी प्रकल्पातील संचालकांच्या हस्ते भागवत आरतीने सांगता झाली.