जळगाव – नवीन बसस्थानकातील जळगाव आगारात सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दिवाळीपासून एसटीचे रुतलेले चाक ४ हजारपैकी २ हजार २६० कर्मचारी कामावर परतल्र्याने सुरळीत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी २२ एप्रिल ही तारीख दिली होती; मात्र, जळगाव विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकमताने निर्णय घेत सोमवारी हजर झाले. त्यामुळे एसटीचा चार हजार फेऱ्यांसह २ लाख ५० हजार किलोमीटर धावण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
जळगाव आगारात सोमवारी सकाळी १० वाजेपासूनच संपकरी जमायला सुरुवात झाली. सर्वच संपकरी अर्ज भरणे, मेडिकल करणे तसेच इतर कागदपत्रे जमा करण्यात व्यस्त झाले होते. सर्व कागदपत्रे जमा झाल्यावर आगारातील दत्त मंदिरात दत्ताचे दर्शन घेत सर्वांनी एकत्रित हजर होण्याबाबतचे अर्ज दाखल केले.