जळगाव – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स ॲकॕडमी येत्या ८ ते १३ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करीत आहे.
ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आली आहे. भारतातील अग्रगण्य मोबाईल प्रिमीयर लिग फाउंडेशन (एम पी एल) व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (अर्थात साई) या संस्था अखिल भारतीय बुध्दीबळ महासंघाशी करारबध्द असून देशभरातील सर्व स्पर्धांसाठी त्यांचे बहुमोल सहकार्य असते. जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले आहे.
या स्पर्धेचा डामडौल काही अनोखाच असतो. भारतभरातील नावाजलेले दहा पुरूष व महिला ग्रँडमास्टर, 13 आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे मास्टर, राज्य संघटनेच्यामार्फत चार अधिक एक राखीव अशा पद्धतीने संघ या स्पर्धेसाठी राज्याचे संघ पाठविले जातात. या प्रत्येक संघासोबत त्यांचा संघ व्यवस्थापक देखील स्पर्धेतील पूर्ण कालावधी दरम्यान राहत असल्याने स्पर्धेतील संघाबाबताचे असंख्य बारकावे ते आयोजकांसमवेत हाताळत असतात.
पुरुष गटामध्ये एल आय सी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आर एस पी बी टीम, तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे.
तर महिला गटामध्ये आंध्र, गुजरात, ओडिसा, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा संघ देखील स्पर्धेत सहभागी असेल.
स्पर्धा सांघिक स्विस पद्धतीने खेळविली जाणार असून ग्रँडमास्टर विसाख, दीपण चक्रवर्ती, स्वप्नील धोपाडे,तेजकुमार, आर आर लक्ष्मण, श्रीराम झा, आंतरराष्ट्रीय मास्टर विघ्नेश, श्याम निखिल, अर्घ्यादिप दास, सी आर जी कृष्णा, सायंतन दास, दिनेश शर्मा पुरुष गटात तर महिला गटात, महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे, किरण मनीषा मोहंती, मेरी गोम्स, दिव्या देशमुख, आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामिनाथन, पद्मिनी राऊत, ईशा करवडे, निशा मोहोता, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर प्रणाली धारिया साक्षी चीतलांगे, तेजस्विनी सागर, महिला फिडे मास्टर बोमिनी मोनिका अक्षया, तोषाली, महिला कँडिडेत मास्टर वैष्णवी आदी खेळाडू सहभागी आहेत.
राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जळगावमध्ये आयोजीत होत असल्याने जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांतून खेळले जाणारे डाव अतिशय चुरशीचे व उत्कंठावर्धक असतील यात शंका नाही. स्पर्धेतील प्रत्येक डावाचा कालावधी ९० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी ३० सेकंद वाढीव वेळ राहणार आहे. अशा दिग्गज खेळाडूंचे डाव अनुभवायची संधी या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम बुद्धिबळ प्रेमींना मिळणार आहे.
ही राष्ट्रीय बुध्दीबळ सांघिक स्पर्धा जळगाव येथील प्रेसिडेंट कॉटेज, अजिंठा रोड या रिसॉर्ट मध्ये आयोजित करण्यात आली आहे.
तब्बल १० लाखाची बक्षिसांची रक्कम विजेत्या संघांना प्राप्त होणार असुन पुरुष व महिला गटात समसमान अशी ५ लाखांची रोख बक्षिसे वितरीत केली जातील. या व्यतिरिक्त स्पर्धेअंती प्रत्येक पटावरील सर्वात जास्त गुण कमावणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.
भारतभरातील बुद्धिबळ प्रेमींच्या खास आग्रहास्तव स्पर्धेतील प्रमुख पट लाईव्ह करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला असून त्या द्वारे घरबसल्या भारतभरातील कुठल्याही राज्यातून हे पटावरील महायुद्ध बुद्धिबळ प्रेमींना अनुभवास येणार आहे. या अशा अधिकृत स्पर्धेतील तांत्रिक बाजू देखील अतिशय भक्कम असणे गरजेचे असते. त्याची जबाबदारी आखिल बुद्धिबळ महासंघ आर्बिटर कमिशनचे प्रमुख धर्मेंद्र कुमार यांनी मुख्य पंच म्हणून स्वीकारलेली आहे.
स्पर्धा आयोजन समितीचे चेअरमन श्री.अशोकभाऊ जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री.अतुल जैन व सचिव नंदलाल गादिया यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, विवेक आळवणी व जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे सदस्य यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजीत केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=CIxX8HouviY