जळगाव प्रतिनिधी – समाज माध्यमातून आसाम येथील चहाची माहिती देऊन जळगावच्या एका प्रौढास स्वत:चा ब्रांड बनवून देण्याचे आमिष देत भामट्याने ३ लाख ८०५ रुपयांत गंडवले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन (वय ४८, रा. शेरा चौक) यांची फसवणूक झाली आहे. २३ जानेवारी रोजी शेख यांच्या फेसबुकवर आसाम चहाची माहिती देणारी ‘पर्ल टी काॅफी शॉप’ची लिंक आली. शेख यांनी लिंक ओपन केल्यानंतर त्यांना संपर्कासाठी काही मोबाइल क्र. व पत्ता दिसून आला. चहाचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेख यांनी संबंधित पेजवर स्वत:चा मोबाइल नंबर दिला. काही वेळातच त्यांना साबीर खान नाव सांगणाऱ्या तरुणाचा फाेन आला. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर खान याने शेख यांच्या व्हाट्सअपवर चहाबद्दल माहिती पाठवली. व्यवसायासाठी १०५ किलो चहा पाठवण्याचे शेख यांनी सांगितले. त्यावर खानने त्यांना तुमचा स्वत:चा ब्रांड बनवा असा सल्ला दिली. त्यानुसार शेख यांनी ‘जायका टी’ असे नाव सुचवले. खानने ‘जायका टी’चे स्टिकर तयार करून पाठवले. त्यामुळे दोघांत विश्वास निर्माण झाला होता.