जळगाव/धुळे/नंदुरबार – शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतून वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी 219 प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी 17 लाख 50 हजार रुपयांच्या थकीत रकमेचा भरणा केला आहे.
वीजचोरीची प्रकरणे दाखल असलेल्या जळगाव परिमंडलातील ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यात 219 प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व 17 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी वसूल झाली. जळगाव जिल्ह्यातील 144 ग्राहकांनी 11 लाख 65 हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर नंदुरबार जिल्ह्यात 3 लाख 97 हजार रुपयांची थकबाकी भरणाऱ्या 53 ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. धुळे जिल्ह्यातील 22 ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत 1 लाख 88 हजार रुपयांची थकीत रक्कम भरून आपली प्रकरणे निकाली काढली.
लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंते फारूक शेख, अनिल बोरसे, पंकज तगलपल्लेवार यांच्यासह महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.