जळगाव प्रतिनिधी – शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची कार्यवाही न केल्यास १ मार्चपासून शिवभोजन केंद्र बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
शिवभोजन योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच कार्यरत शिवभोजन केंद्रावर परिणामकारक नियंत्रण ठेवण्याकरिता सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये ३१ जानेवारीपर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या होत्या. त्यानंतरही काही शिवभोजन केंद्र चालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीतही जे शिवभाेजन केंद्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणार नाहीत, ते मार्च महिन्यापासून बंद हाेतील.