जळगाव प्रतिनिधी – एमआयडीसी व पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ट्रकमधील साहित्य चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे व जळगाव शहरातून अटक केली आहे. त्यांनी ट्रकमधून चोरलेला सुमारे १९ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
मोबीन अहमद पटेल (वय ४७, रा. भादली, ता. जळगाव, हल्ली मुक्काम कोंढवा पुणे) व इक्बाल उर्फ इक्बाल टेलर अन्वर पटेल (वय ४८, रा. रजा कॉलनी, शेरा चौक, जळगाव) अशी संशयितांची नावे आहे. ट्रकमधील साहित्य चाेरीप्रकरणी पहूर व एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी एलसीबीला दिलेले होते. पहूर येथील गुन्ह्यात एलसीबीने संशयितांची माहिती काढली. त्यानुसार मोबीन या गुरुवारी पुणे येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या साहित्यांपैकी १० लाखांचे साहित्य हस्तगत केले आहे. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर चोरीस गेलेल्या साहित्यांपैकी उर्वरित साहित्य इक्बाल पटेल याला विकले असल्याचे सांगितले. शुक्रवारी पोलिसांनी त्याची घर झडती घेतली. त्याच्या घर झडतीत चोरीस गेलेल्या उर्वरित माला पैकी सुमारे ९ लाखांचा माल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आला आहे. इक्बाल याची अधिक कसून चौकशी केल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचीही दिली कबुली दिलेली आहे.