मुंबई, । मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या चित्रीकरणामुळे एकापाठोपाठ एक डमी उमेदवार सापडत आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांचे कनेक्शन समोर येत असून, पोलिस भरतीचे धडे देणाऱ्या खासगी क्लासचा यात सहभाग असल्याचे आढळले आहे. औरंगाबाद येथील एका शिक्षकाने तीन उमेदवारांची मैदानी चाचणी दिली आहे. यासाठी त्याने या तीन उमेदवारांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले असल्याने पोलिस या शिक्षकाचा शोध घेत आहेत. अन्यही जिल्ह्यांत या प्रकरणाची व्याप्ती असल्याचा संशय आहे.
मुंबई पोलिस दलामधील १,०७६ शिपाई पदांसाठी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी वेगवेगळ्या केंद्रांवर लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेला एक लाखांपेक्षा अधिक उमेदवार बसले होते. त्यानंतर ६ ते १५ डिसेंबरच्या कालावधीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक परीक्षेदरम्यान चित्रीकरण करण्यात आले होते. पाच जानेवारीला निवड झालेल्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या १,०७६ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी हे उमेदवार प्रत्यक्षात चाचणी घेणाऱ्या उमेदवारासमोर हजर राहत आहेत. लेखी परीक्षा, मैदानी चाचणी तसेच अर्जावरील फोटो आणि प्रत्यक्षात हजर असलेला उमेदवार यामध्ये साम्य आहे का, हे तपासताना आठ उमेदवारांसाठी आठ डमी उमेदवारांनी परीक्षा दिल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.
औरंगाबाद येथील एका क्लासमध्ये मैदानी चाचणीबाबत मार्गदर्शन करणारा शिक्षक गणेश पवार याने तीन उमेदवारांसाठी मैदानी चाचणी दिली आहे. पोलिसांनी मूळ उमेदवारांना अटक केली असून, गणेश याचा शोध सुरू आहे. केवळ मैदानी चाचणी देण्यासाठी गणेशला प्रत्येकी तीन लाख रुपये दिल्याचे या उमेदवारांनी सांगितले आहे.
आणखी ४२ जण संशयाच्या भोवऱ्यात
लेखी परीक्षा आणि त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या १,०७६ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांतून निवड झालेले ४२ उमेदवार बोलावूनही अद्याप पडताळणीसाठी गैरहजर आहेत. हे सर्व संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
यंदा प्रथमच चेहरे कॅमेऱ्यात टिपले
भरती प्रक्रियेचे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रीकरण करण्यात येते. सीसीटीव्ही कॅमेरा किंवा इतर कॅमेऱ्यातून सरसकट सर्व चित्रित होते. मात्र, यंदा प्रथमच सर्वांचे चेहरे कॅमेऱ्यात टिपण्यात आले. वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रे पडताळणीदरम्यान छातीवरील बॅच क्रमांकानुसार उमेदवाराचा चेहरा जुळविण्यात आला. त्यामुळेच इतके डमी उमेदवार सापडले