बिजींग : वृत्तसंस्था । कोरोनाची लागण झाली आहे याची खात्री करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट सध्याच्या घडीला अचूक मानली जाते. मात्र या टेस्टचा निकाल येण्यास बराच वेळ लागतोय. यासाठीच आता चीनमधील संशोधकांनी अशी कोविड-19 टेस्ट विकसित केली आहे,ज्यामध्ये अवघ्या 4 मिनिटांत निकाल समोर येतोय. या तज्ज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या कोरोना चाचणीचा रिझल्ट आरटीपीसीआर चाचणीइतकाच अचूक असणार आहे.
आतापर्यंत अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान कोरोना टेस्टसंदर्भात अनेक आव्हानेही समोर आली. टेस्ट करण्याची गरज लक्षात घेता चीनच्या संशोधकांनी मोठी गोष्ट समोर आणली आहे.चीनच्या फुदान विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत दावा केला आहे.
नेचर बायोमेडिकल इंजिनीअरिंग जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या एका आर्टिकलमध्ये, संशोधकांच्या टीमने सांगितले की, स्वॅब्समधून जेनेटिक मटेरियलचे विश्लेषण करण्यासाठी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स वापरतात त्यांच्या सेन्सरचा वापर करून लॅब चाचण्यांसाठी लागणारा वेळ कमी करता येईल.
फुदान विद्यापीठातील तज्ज्ज्ञांनी सांगितले की, एकदा ही चाचणी पद्धत विकसित झाली की, ती एअरपोर्ट, आरोग्य सुविधा आणि घरीही विविध परिस्थितींमध्ये वापरली जाऊ शकते.