पुणे, वृत्तसंस्था । गेल्या काही महिन्यांपासून स्थिरावलेल्या खाद्यतेलांच्या दरात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया- युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती, इंडोनेशिया, मलेशियातील तेल निर्यातीवरील निर्बंध तसेच दक्षिण अमेरिकेतील हवामान बदलामुळे तेथून आयात होणाऱ्या पाम तेल, सूर्यफूल, सोयाबीन या तेलांची आवक घटण्याची शक्यता आह़े त्यामुळे खाद्यतेलांच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.
भारतात दरवर्षी 250 लाख टन खाद्यतेलांचा वापर केला जातो त्यापैकी 160 लाख टन खाद्यतेल परदेशातून आयात केले जाते. युक्रेनमधून सूर्यफुलाच्या तेलाची आयात केली जाते. रशिया- युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून होणारी सूर्यफूल तेलाची आयात कमी होणार आहे. इंडोनेशिया,मलेशियात पाम तेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील सरकारने पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. ब्राझील, अर्जेटिना या देशांतील हवामानामुळे सोयाबीनच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम खाद्यतेलांच्या आयातीवर होणार असून फेब्रुवारीनंतर पुन्हा खाद्यतेलांचे दर टप्याटप्याने वाढण्याची शक्यता खाद्यतेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
उत्तरेकडील राज्यातील थंडी तसेच हिमवृष्टीचा फटका मोहरीच्या लागवडीस बसला आहे. त्यामुळे त्या तेलाच्याही दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अर्जेटिना, ब्राझील, अमेरिका या देशांमध्ये सोयाबीन तेलाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. तेथील हवामान बदलामुळे यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली आहे.
मलेशिया, इंडोनेशियातील तेलाची जहाजे बंदरातच
भारतात पाम तेलाचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. मलेशिया, इंडोनेशियातून निर्यात होणाऱ्या पाम तेलातील पाम स्टेरीनचा वापर वनस्पती तुपात केला जातो. या दोन्ही देशात सध्या कोरोना संसर्गामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याने पाम तेलाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तेथील सरकारने निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. पाम तेलाची 60 जहाजे तेथील बंदरात आहेत त्यापैकी 15 जहाजे भारताची आहेत. निर्बंधामुळे ही जहाजे परदेशात रवाना होऊ शकत नाहीत.
युद्धाबरोबरच तेलाचाही भडका
रशिया आणि युक्रेन हे देश युद्धाच्या उंबरठय़ावर आहेत. त्यामुळे तेथून होणारी सूर्यफुल तेलाची आवक गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. भारतात सूर्यफूल तेलाची 80 टक्के आयात युक्रेनमधून होते.
थंडीमुळे मोहरीला फटका
पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेशसह उत्तरेकडील बहुतांश राज्यांत मोहरीची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. यंदाच्या हंगामात मोहरीची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. उच्चांकी उत्पादन मिळण्याची शक्यता वाटत असताना कडाक्याच्या थंडीचा फटका मोहरीला बसला आहे.त्यामुळे मोहरीच्या गुणवत्तेवरही परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर स्थिरावले आहेत. शेंगदाणा तेल, मोहरी तेलाचे उत्पादन देशात मोठय़ा प्रमाणावर केले जाते मात्र, खाद्यतेलांची एकंदर गरज पाहता परदेशातून होणाऱ्या तेल आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. अवकाळी पावसाचा फटका खरीप पिकांना बसला असल्याने लागवडीतही घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे फेब्रुवारीनंतर खाद्यतेलाच्या दरात पुन्हा टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे.