जळगाव, प्रतिनिधी । विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला ८ रोजी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एमआयडीसी परिसरातील श्रीराम पॉलिमर्स या कंपनीत १३ हजार ६०० रुपये किंमतीच्या विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलीसांनी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकीता राजेंद्र महाजन (वय-१९) रा. मेहरूण जळगाव यांची एमआयडीसीच्या व्ही सेक्टर मधील श्रीराम पॉलीमर्स नावाची चटई तयार करण्याकामी लागणाऱ्या दाण्याची कंपनी आहे. १७ जानेवारी रोजी निकीता आणि त्यांची आई सल्भा महाजन यांनी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील काम बंद करून घरी गेले. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कूलूप तोडून कंपनीतून पाण्याची मोटर, शिलाई मशीन, दाणा मशिनचे दोन कटर, १०० मीटर वायर, दाणा मशिनला आवश्यक असणाऱ्या तिन पुली असा एकुण १३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी नेल्याचे २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले होते.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील संशयित आरोपी उमेश उर्फ साई सोनाजी आटे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव हा एमआयडीसी परिसरात असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, योगेश बारी यांनी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता अटक केली. संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर यापुर्वी वेगवेगळे सात गुन्हा दाखल आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.