जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा निकालानंतर सोमवारी सुवर्णपदक धारकांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अर्चना महेश पंजाबी हिने प्रावीण्य मिळवले आहे. ती राज्यातून पाचवी आली असून औषधशास्त्र विषयात राज्यातून प्रथम आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची अर्चना महेश पंजाबी या विद्यार्थिनीने सर्वोत्तम यश मिळवले आहे. पहिल्या वर्षी देखील तिने महाविद्यालयातून उत्तम गुणांकन प्राप्त केले होते. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निकालातही तिने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे नाव उंचावले आहे.
राज्यभरातून ती पाचवी आली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय औषधशास्त्र विषयांमध्ये ती राज्यातून प्रथम आली असून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिच्या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. किशोर इंगोले, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.इमरान तेली यांनी अभिनंदन केले आहे.
“महाविद्यालयांमध्ये तासिकामध्ये शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि सोप्या पद्धतीने केलेला अभ्यास यामुळे यश मिळवणे सोपे गेले. यशामध्ये शिक्षक वर्गासह पालकांचा मोठा वाटा आहे. यशामुळे प्रोत्साहन मिळाल्याने तृतीय वर्षाला देखील मोठ्या उत्साहाने अभ्यास करणे सोपे जाणार आहे.”
– अर्चना पंजाबी, द्वितीय वर्ष, एमबीबीएस.